Tuesday, August 30, 2011

भाग्यवान पुरुष कसा ओळखावा ?

भाग्यवान पुरुषाची लक्षणे कोणती ?

श्री समर्थांनी १९-३ या समासात करंट्याची लक्षणे सांगितल्यावर शिष्य विचारतात : भाग्यवान पुरुषाची लक्षणे कोणती ? तेव्हा श्री समर्थ सांगतात :

उपजत गुण शरीरी | परोपकारी नानापरी | आवडे सर्वांचे अंतरी | सर्वकाळ || १९-४-२ ||

नाना उत्तम गुण सत्पात्र | तेचि मनुष्य जगमित्र | प्रगट कीर्ती स्वतंत्र | पराधेन नाही || १९-४-६ ||

राखे सकळांचे अंतर | उदंड करी पाठांतर | नेमस्तपणाचा विसर | पडणार नाही || १९-४-७ ||

ज्यांचे अंगी काही गुण उपजतच असतात ,तो अनेक मार्गांनी परोपकार करतो .तो सर्वांना नेहमीच आवडतो .तो सदेव ,भाग्यवान होय .तो कोणाचे मन मोडत नाही .चांगल्याची संगत सोडत नाही .तो सर्वांना हवाहवासा वाटतो .जेथे तो जातो तेथे तेथे तो नवीनपणे लोकांना हवाहवासा वाटतो .अनेक उत्तम गुण त्याच्या जवळ असतात त्यामुळे तो सत्पात्र असतो .त्यामुळे तो जगमित्र असतो .तो सर्वांचे अंत:करण सांभाळतो .त्याचे पाठांतर खूप असते .तो नित्य नियमित आचरण करत असतो .तो अविरत परोपकार करतो .त्यामुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो .सर्व जण त्याची वाट पहात असतात .कारण तो प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळेस मदतीला उभा असतो .त्याच्या जवळ १४ विद्या ६४ कला असतात .तो संगीत जाणतो ,स्वत: गातो .न्याय नीती भजन मर्यादा सांभाळून तो आपला काळ सार्थकी लावतो .त्यामुळे अशा उत्तम गुणांनी ज्याचे अंत:करण शृंघारले असते .असा पुरुष सर्व पुरुषात शोभून दिसते .

प्रपंची जाणे राजकारण | परमार्थी साकल्य विवरण | सर्वांमध्ये उत्तम गुण | त्यांचा भोक्ता ||१९-४-१७ ||

मागे येक पुढे येक | ऐसा कदापी नाही दंडक | सर्वत्रांसी अलौकिक | तया पुरुषाची ||१९-४-१८ ||

कर्मवीधी उपासनाविधी |ज्ञानविधी वैराग्यविधी | विशाळ ज्ञातृत्वाची बुद्धी |चळेल कैसी || १९-४-२० ||

उत्तम पुरुष प्रपंचात राजकारण म्हणजे व्यवहारचातुर्य जाणतो .परमार्थात आत्मानात्म विवेक व सारासार विचार जाणतो . सगळ्यात जे उत्तम असतो त्यांचा तो रसिक असतो ..तो मागे एक पुढे एक असे दुटप्पेपणे असे वागत नाही . तो कोणाचे अंत:करण दुखवत नाही . कर्म ,उपासना ,न्यान आणि वैराग्य ह्या चारही गोष्टी त्याच्या जवळ योग्य पध्दतीने आढळतात .

दुस-याच्या दु:खे दुखवे | दुस-याच्या सुखे सुखावे | अवघेची सुखी असावे |ऐसी वासना || १९-४-२३ ||

त्याला दुस-याच्या दु:खाने दु:ख होते .दुस-याच्या सुखाने तो सुखी होतो .सर्वजण सुखी असावे असे त्याला वाटते . त्यासाठी तो प्रयत्नही करतो .त्याला कोणाचे उणे सहन होत नाही . त्याला पैशाची अभिलाषा नसते .कोणी त्यांचा धिक्कार केला तरी तो मनात अस्वस्थ होत नाही .त्यांचा तोल तो ढळू देत नाही कारण तो आपल्या शरीराला मिथ्या समजत असतो .कोणी त्याची निंदा केली तरी ती देहापुरती आहे अशी त्याची खात्री पटते ..तो खरा ज्ञाता असतो .त्यामुळे त्याच्या जवळ देहबुद्धी नसते .

हे अवघे अवलक्षण | ज्ञाता देही विलक्षण | काही तऱ्ही उत्तम गुण | जनी दाखवावे || १९-४-२७ ||

लोकी अत्यंत क्षमा करिती | आलिया लोकांचे प्रचीती | मग ते लोक पाठी राखिती | नाना प्रकारे || १९-४-२९ ||

देहबुद्धी असणे हे अवलक्षण आहे .ज्ञाता पुरुष देहात असला तरी तो देह मिथ्या आहे हे तो जाणतो .त्याच्या जवळ देहबुद्धी नसते देहात असून तो विदेहीपणे राहतो .उत्तम गुणांमुळे लोक त्याच्या कडे आकर्षिले जातात .उत्तम गुणांची जोपासना करण्या साठी ज्ञानी पुरुषाला तीक्ष्ण व सूक्ष्म बुद्धी लागते .ती भाग्यवान पुरुषाचे अंगी असते .म्हणून तो लोकांचे अन्याय व अपराध क्षमा करतो .तो क्षमाशील असतो .असा महापुरुष सदैव धीर ,उदार ,गंभीर असतो .जेव्हडे उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषाची लक्षणे आहेत .



No comments: