दासबोधाच्या तत्वज्ञानाचा सारांश काय ?
२०-१० हा अखेरचा समास ‘दासबोध ‘या ग्रंथाचा सारांश आहे .यात प्रथम एकटे एक असलेले
परब्रह्म कसे आहे याचे वर्णन आहे .
धरुं जाता धरता न ये | टाकू जाता टाकता न ये | जेथे तेथे आहेच आहे | परब्रह्म ते ||
२०-१०-१ ||
जिकडे तिकडे जेथे तेथे | विन्मुख होता सन्मुख होते | सन्मुख पण चुकेना ते | कांही केल्या ||
२०-१०-२ ||
परब्रह्म धरावे म्हटले तर धरता येत नाही .टाकावे म्हटले तर टाकता येत नाही .ते परब्रह्म
सर्वत्र आहेच आहे .कोणत्याही दिशेला आपण वळलो तरी ते समोर आहेच .जसे एखादा बसलेला माणूस उठून गेला ,तर तेथे आकाश असतेच .कोणत्याही दिशेला तोंड वळवले तर आकाश तोंडा
समोर असतेच .माध्यान्हीचा सूर्य जसा सर्वांच्या माथ्यावर असतो तसे सर्वांच्या डोक्यावर आकाश असते .पण सूर्याचा दृष्टांत परब्र्ह्मासाठीलागू पडत नाही .कारण सूर्य एकदेशी आहे तर ब्रह्म सर्वदेशी आहे .
परब्रह्म पोकळ घनदाट | ब्रह्म सेवटाचा सेवट | ज्यासी त्यासी ब्रह्म नीट | सर्वकाळ || २०-१०-१०||
परब्रह्म पोकळ म्हणजे रिकामे आहे .पान्ते दाट भरलेले आहे .ब्रह्म पोकळ आहे म्हणजे त्याच्या खेरीज अन्य वस्तूच नाही म्हणून्ते भरलेले आहे .सगळ्यांचा शेवट ब्रह्मातच होतो .
दृश्या सबाहे अंतरी | ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी | आरे त्या विमळाची सरी | कोणास द्यावी ||
२०-१०-११ ||
वैकुंठ कैलास स्वर्गलोकी | ईंद्रलोक चौदा लोकी | पन्नगादीक पातळ लोकी | तेथेची आहे ||
२०-१०-१२ ||
कासी पासून रामेश्वर | आवघे दाटले अपार | परता परता पारावार | त्यास नाही || २०-१०-१३ ||
या ब्रह्मांडाच्या उदरात गच्च पणे भरलेले ब्रह्म दृश्याच्या आत बाहेर व्यापून आहे .त्या निर्मळ ब्रह्माची सर् कोणाला येत नाही .वैकुंठ ,कैलास ,स्वर्गलोक ,इहलोक ,परलोक ,ईंद्रलोक ,चौदालोक ,महासर्पाचे पाताळ लोक या सर्वांना ब्रह्म व्यापून आहे .काशीपासून रामेश्वर पर्यंत सगळीकडे ब्रह्म अपार व्यापून आहे .ते एकटे ,एकमेव ,अद्वितीय आहे ,
परब्रह्म सर्वांना व्यापून आहे ,सगळ्यांना स्पर्श करणारे आहे .ते पावसाने भिजत नाही .चिखलाने माखले जात नाही .पुराबरोबर वाहून जात नाही .ते सर्व दिशांना एकाच वेळी असते .
परब्रह्माने जणू काही आकाशाचा डोह केला आहे .त्या डोहातील पाणी उचंबळत नाही ,त्याची कल्पना करता येत नाही ,अशा अफाट विस्ताराने हा डोह पसरला असल्या सारखे वाटते .
संत साधूमहानुभावा | देव दानव मानवा | ब्रह्म सकळांसी विसावा | विश्रांतीठाव || २०-१०-१९ ||
संत साधू महात्मे देव दानव मानव या सगळ्यांच्या विश्रांतीचे स्थान परब्रह्मच आहे .ते अनंत ,अमर्याद आहे .ते स्थूल नाही ,सूक्ष्म नाही ,या विश्वातील कोणत्याही गोष्टी सारखे नाही ,की ज्याची उपमा परब्रह्माला देता येईल .पिंड ब्रह्मांड दोन्ही भासरूप आहेत .त्यांचा निरास झाला की ब्रह्म निराभास होते .
या सर्व व्यापक अनंत ब्रह्माला ओळखण्याचा उपाय समर्थ सांगतात .
ब्रह्मासी शब्दचि लागेना | कल्पना कल्पू शकेना | कल्पनेतीत निरंजना | विवेके वोळखावे ||
२०-१०-२४ ||
शुध्द सार श्रवण | शुध्द प्रत्ययाचे ज्ञान | विज्ञानी पावता उन्मन | सहजचि होते ||२०-१०-२५ ||
शब्द ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही .मानवी मन ब्रह्माची कल्पना करू शकत नाही .अशा या कल्पनातीत निरंजन स्वरूपाला विवेकाने ओळखायला हवे असे समर्थ सांगतात .त्यासाठी श्रवण व मनन करायला हवे .मग ब्रह्म स्वरूप ओळखता येते .जन्म सार्थकी लागतो .संपूर्ण समाधान होते .
श्रवण व मनन करून स्वानुभव घेतला की ज्ञानाचे विज्ञान होते .उन्मनी अवस्था प्राप्त होते .उन्मनी अवस्था प्राप्त झाली की साधनेचे फळ मिळते .संसार सफल होतो .निश्चळ व निर्गुण परब्रह्म अंतर्यामी स्थिर होते .साधना विराम पावते
या दृश्य विश्वाचे स्वप्न पाहणारा जीव आत्मज्ञानाच्या जागेपणात आल्यावर दृश्यभास विसरतो .अनिर्वचनीय परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतो .जन्म मृत्यू शून्यवत होतो .साधक अमृत पदाला पोहोचतो ..शेवटी समर्थ सांगतात की दासबोध म्हणजे भगवंताची वाणी आहे .तोच खरा ग्रंथकर्ता आहे .
हा प्रकल्प सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण !