Wednesday, September 21, 2011

अंतरात्मा

अंतरात्मा

सकळ चालता येक | अंतरात्मा वर्तवी अनेक | मुंगीपासून ब्रह्मादिक | तेणेचि चालती || १०-१०-३५ ||

तो कळतो परी दिसेना |प्रचीत येते परी भासेना | शरीरी असे परी वसेना | येके ठाई ||१०-१०-३७ ||

तीक्षण गगनी भरे | सरोवर देखतांच पसरे | पदार्थ लक्षून उरे | चहूंकडे ||१०-१०-३८ ||

जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो | तो त्यासारिखाच होतो | वायोहून विशेष तो | चंचळ विषयी ||१०-१०-३९ ||

एकच अंतरात्मा सर्वांना चालवतो .नाना प्रकारची हालचाल घडवतो . मुंगीपासून ब्रह्मदेवा पर्यंत सर्व जीव अंतरात्म्याच्या सत्तेने काम करतात . तो आहे हे कळते पण तो दिसत नाही .त्याच्या अस्तित्वाचा अनुभव येतो पण तो वेगळेपणाने भासत नाहीत .तो शरीरात असतो पण एके ठिकाणी रहात नाही .संपूर्ण आकाशात संचारतो .तर कधी सरोवरात पसरतो .प्रत्येक पदार्थासारखा तो बनतो .वायूपेक्षा ही जास्त चंचल अंतरात्मा असतो .तो दृष्टीने पहातो ,जिभेने चाखतो ,मनाने ओळखतो .सर्वांच्या अंतर्यामी असतो .तो सर्वांमध्ये आहे ,सर्वांपेक्षा निराळा आहे .तो पुरुष ,स्त्री ,बाल तरूण वृध्द नाही .नपुंसकाच्या देहात राहूनही तो नापुंसंक नाही . तो सर्व देहांना चालवतो .तरीही तो करून अकर्ता आहे .तो देहात रहातो म्हणून त्याला क्षेत्रज्ञ ,क्षेत्रवासी ,कूटस्थ म्हणतात .

अनेक प्राणी निर्माण होती |परी येकचि कला वर्तती | तये नाव जगज्जोती | जाणती कला ||११-१-२६ ||

सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी | नाना सुख दु:खे परीक्षी | त्यास म्हणती अंतरसाक्षी |अंतरात्मा || ११-१-२९ ||

अनेक प्रकारच्या प्राण्यांना चालवणारी ,वागवणारी जीवनकळा एकच आहे .तिलाच जीवनकळा किवा जाणती कला म्हणतात .कानाच्या द्वाराने ती अनेक शब्द जाणते ,त्वचेने थंड गरम जाणते ,डोळ्यांनी अनेक पदार्थ पहाते ,जिभेने रस जाणते ,नाकाने वास घेणे जाणते .कर्मेंद्रीयाने देहाचे रक्षण करते .नाना सुख दु:खांची परीक्षा करते .

समर्थ निर्विकार परब्रह्म आणि अंतरात्मा यातला फरक सांगतात .

ब्रह्म जाणिजे निश्चळ |अंतरात्मा तो चंचळ |द्रष्टा साक्षी केवळ | बोलिजे तया || ११-४-२ ||

तो अंतरात्मा म्हणिजे देव | त्यांचा चंचळ स्वभाव |पाळीताहे सकळ जीव | अंतरी वसोनी ||११-४-३||

त्यावेगळे जड पदार्थ | तेनेवीण जड व्यर्थ | तेणेचि कळे परमार्थ |सकळ काही ||१७-४-४ ||

संपूर्ण ब्रह्म शाश्वत आहे तर अंतरात्मा अशाश्वत आहे .तो सर्व जीवांच्या अंतर्यामी रहातो .,त्यांचे पालन करतो .अंतरात्म्याला द्रष्टा व केवलसाक्षी म्हणतात .त्याच्या शिवाय वेगळे असणारे सर्व पदार्थ जड ,अचेतन असतात .अंतरात्मा नसेल तर देह अचेतन पणे उरतो .,व्यर्थ होतो .अंतरात्म्या मुळे परमार्थ कळतो कर्ममार्ग ,उपासना मार्ग ,ज्ञानमार्ग ,सिध्दांत मार्ग ,,प्रवृत्ती मार्ग ,निवृत्ती मार्ग हे सर्व अंतरात्माच चालवतो .

देव या सकळांचे मूळ | देवास मूळ नं डाळ | परब्रह्म ते निश्चळ | निर्विकार ||११-४-८ ||

अंतरात्मा सर्व दृश्याचे व कर्माचे मूळ आहे .प्रकृतीमुळे अस्तित्वात येणा-या अंतरात्म्याला मूळ व शेंडा नाही .खरे अस्तित्व नाही .खरे अस्तित्व निर्विकारी व शाश्वत परब्रह्माला आहे .

तो येकची विस्तारिला | ओ अंतरात्मा बोलिला | नाना विकारी विस्तारिला | निर्विकारी नव्हे || ११-४-१५ ||

एकच आत्मा विश्वरूपाने विस्तारिला आहे .अशा प्रकारे अनेक भेदांनी व बदलांनी विलसणारा अंतरात्मा निर्विकारी ब्रह्म नाही .

तेणेवीण कार्य न चले | पडिले पर्ण तेहि न हाले | अवघे त्रैलोक्यचि न चले |जयाचेनि ||११-८-२ ||

तो अंतरात्मा सकळांचा |देवदानव मानवांचा | चत्वार खाणी चत्वार वाणींचा | प्रवर्तकू ||११-८-३ ||

तो येकालांचि सकला घटी | करी भिन्न भिन्न राहाटी | सकळ सृष्टीची गोष्टी | किती म्हणून सांगावी ||११-८-४ ||

ऐसा जो गुप्तेश्वर | त्यास म्हणावे ईश्वर | सकळ ऐश्वर्य थोरथोर | जयाचेनि भोगिती ||११-८-५ ||

अंतरात्म्या शिवाय कोणतेही कार्य घडून येत नाही .त्याच्या सत्तेवाचून पडलेले झाडाचे पानही हालत नाही .त्याच्या पासून मिळालेल्या प्रेरणेने त्रैलोक्य हालचाल करते .देव ,दानव ,मानव ,चार खाणी ,चार वाणी या सर्वांचा प्रवर्तक अंतरात्मा आहे . तोच सर्व प्राण्यांच्या देहात वास करतो .निरनिराळ्या त-हेने वागण्यास प्रेरणा देतो .विश्वात आढळणारे त्याचे कर्तुत्व अफाट आहे .अशा अंतरात्म्याचे ज्याला ज्ञान होते ,तो विश्वव्यापी विश्वंभर होतो .

असा सर्वांमध्ये अंतर्यामी आढळणारा आत्मा हाच खरा देव आहे .म्हणून त्याला पुरुष म्हणतात .जगात राहणा-या अंतरात्म्यास जगदीश म्हणतात .जगाच्या अंतर्यामी जी शुध्द जाणीव वास करते ,सर्व शरीराला हालचाल करण्याची प्रेरणा देते ,ती जाणीव म्हणजे विष्णू ,विश्वाचे अंत:करण ! जगात वावरणारी जाणीव आपल्या अंत:करणात वास करते . तोच अंतरात्मा !

अंतरात्म्याला देहात राहून सुख दु:ख हे भोग भोगावे लागतात .जगात होणारी कीर्ती ,अपकीर्ती अतिनिंदा ,अतिस्तुती हे सर्व अंतरात्म्याला भोगावे लागते .

या अंतरात्म्याचे कर्तेपण जाणणारा माणूस क्वचितच आढळतो फार मोठे पुण्य असेल तरच अनुसंधान साधता येते .

No comments: