Wednesday, September 21, 2011

मन

मन

भगवान श्रीकृष्ण गीतेत विभूती सांगताना म्हणतात ईंद्रीयाणां मनश्चामी ईंद्रीयांचा राजा जे मन ते मी आहे . श्री समर्थ मना बद्दल म्हणतात

तेथे सुख असे वाड | नाही मनास पवाड | मनावीण कैवाड | साधनाचा ||७-२-१६ ||

त्याची मनेवीण प्राप्ती |किं वासनेवीण तृप्ती | तेथे न चले वित्पत्ती | कल्पनेची ||७-२-१७ ||

तव परेहुनी पर् | मनबुद्धी अगोचर | संग सोडिता सत्वर | पाविजेती || ७-२-१८ ||

देहबुद्धीतून आत्मबुद्धीत साधक गेला की त्याला सुखाची कमतरता नसते .कारण तेथे मनाचा शिरकाव नसतो .जोपर्यंत मन मनपणे असते तेव्हा मी साधना करतो अशी भूमिका साधकाची असते .पण आत्मबुद्धी प्राप्त झाल्यावर जीव शिव बनतो .तेथे सुखाची वाण नसते .अनुसंधानरूप झाल्यावर साधना वेगळेपणे नसते .स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी मन लागत नाही .तेथे वासनातृप्ती न करता तृप्ती मिळते . स्वरूपसाक्षात्कारात मन नसून अनुभव येतो .वासना तृप्त न करता समाधान मिळते .ब्रह्मस्वरूप हे मनबुद्धीच्या पलीकडे असल्याने साधक जेव्हा देहाचा ,मनाचा संबंध सोडतो तेव्हा त्याला ताबडतोब ब्रह्मप्राप्ती होते .

हेच मन काय काय करते ?

सत्य ब्रह्माचा संकल्प | मिथ्या मायेचा विकल्प | ऐसीया द्वैताचा जल्प | मनची करी ||७-५-४ ||

संकल्पविकल्पाची सृष्टी |जाली मनाचिये पोटी | ते मनाची मिथ्या सेवटी | साक्षी कवणु || ७-५-७ ||

मनच संकल्प करते .मनाने केलेली ब्रह्माची कल्पना खरी असते .तिला संकल्प म्हणतात .मन जेव्हा मायेची कल्पना करते ,तेव्हा ती खोटी असते .तेव्हा तिला विकल्प म्हणतात .ब्रह्म ,माया ,संकल्प ,विकल्प या सर्व द्वैताच्या कल्पना मनच करते .

जे मन म्हणून आहे ,त्याच्या पोटातून संकल्प विकल्पाची सृष्टी बाहेर पडते तेव्हा तेच खोटे ठरते .मन नाहीसे झाल्यावर साक्षीपणे पाहायला कोणी उरत नाही .

मनाच्या अनंत वृत्ती | जाणणे तेचि आत्मस्थिती | त्रैलोकी जितुक्या वेक्ती | तदांतारी आत्मा || १३-९-२७ ||

मनात अनंत वृत्ती निर्माण होतात ,जीवात्मा हे सर्व जाणतो सर्व वृत्ती जाणणे हा जीवात्म्याचा धर्म . त्रेलोक्यातील सर्वांच्या अंतर्यामी जीवात्मा वास करतो .

मनास मिळता मन | पाहोन येता निरंजन | चंचळ उलंघून |पैलाड जाती || १५-५-२२ ||

मनोधर्म येकदेसी | कैसा आकळिल वस्तूसी | निर्गुण सांडून अपेसी | सर्व ब्रह्म म्हणे ||१५-५-२८ ||

आपले मन दुस-याच्या मनाशी तदाकार करता आले ,की निरंजन परमात्मस्वरूप अनुभवता येण्याची शक्ती प्राप्त होते .आपले मन दुस-याच्या मनाशी तदाकार केले की आपला मीपणा विरतो ,कल्पनेला विराम मिळतो .वेगळेपणा खुंटतो .आणि चंचळातून पलीकडे जाण्यास उपयोगी पडते .

मानवाचे मन येकदेसी आहे ,तर परब्रह्म सर्वदेसी आहे .म्हणून मन परब्रह्माला जाणू शकत नाही .त्यामुळे माणसाचे मन परब्रह्म शोधू शकत नाही ,मग अशी माणसे निर्गुण सोडून सर्व ब्रह्म एकच आहे असे म्हणू लागतात .

मनाची व्याख्या समर्थ करतात :

अंत:कर्ण आठवले | पुढे होये नव्हेसे गमले | करूं न करू ऐसे वाटले |तेचि मन || १७-८-५ ||

संकल्पविकल्प तेचि मन | जेणे करितां अनुमान | पुढे निश्चयो तो जाण | रूप बुद्धीचे || १७-८-६ ||

अंत:करणात जे आठवले ते होईल की नाही ,करावे की करू नये अशी दोलायमान स्थिती येते तेव्हा ते मन असते .संकल्प विकल्प करणारी जी जाणीव ते मन असते .

मन दिसते मां धरावे | ज्याचे त्याने आवरावे | आवरून विवेके धरावे | अर्थांतरी ||१८-१०-१७ ||

मन जर धरता आले असते तर त्याला धरता आले असते .पण ते दिसत नाही .म्हणून मनाला आवरावे लागते .आपणच मन विवेकाने आवरून अर्थ शोधावा लागतो .

सूत गुंतले ते उकलावे | तेथे मन उगवावे | मानत मानत घालावे | मुळाकडे || २०-९-१९ ||

सुताचा गुंता केला की तो आपण मनाला परब्रह्माकडे वळवावे .अनेक ठिकाणी अनेक प्रकारे गुंतलेले मन क्रमाक्रमाने सोडवावे ,व अंतर्मुख होऊन परब्रह्माकडे वाटचाल करण्याची सवय मनास लावावी .

No comments: