Wednesday, September 21, 2011

एक चौदा च्यार पांच

एक चौदा च्यार पांच म्हणजे काय ?

येथून पाहातां तेथवरी | चत्वार जिनस अवधारी | येक चौदा पांच चारी | ऐसे आहे || २०-५-१ ||

समर्थ सांगतात की या विश्वरचनेमध्ये फक्त चारच पदार्थ आहेत .एक चौदा पांच च्यारी !

शिष्य विचारतात एक चौदा पांच च्यार म्हणजे काय ?

समर्थ सांगतात :

परब्रह्म सकळांहून वेगळे | परब्रह्म सकळांहून आगळे | नाना कल्पने निराळे |परब्रह्म ते ||२०-५-२ ||

परब्रह्माचा विचार | नाना कल्पनेहून पर् | निर्मळ निश्चळ निर्विकार | अखंड आहे || २०-५-३ ||

परब्रह्म कांहीच तुळेना | हा येक मुख्य जिनसाना | दुसरा जिनस नाना कल्पना | मूळमाया ||२०-५-४ ||

परब्रह्म सर्व पदार्थांहून वेगळे ,आगळे आहे ,म्हणजे श्रेष्ठ आहे .मानवी कल्पनेच्या हून निराळे आहे .आपल्या कल्पनेच्या पलीकडे असणारे परब्रह्म निर्मळ ,निश्चळ ,निर्विकार व अखंड आहे .परब्रह्म हाच या विश्वरचनेचा मुख्य जिन्नस आहे .त्याच्या बरोबर कशाचीही तुलना करता येत नाही .कल्पनेने भरलेली मूळमाया दुसरा जिन्नस आहे .

नाना सूक्ष्मरूप |सूक्ष्म आणि कर्दमरूप | मुळींच्या संकल्पाचा आरोप | मूळमाया || २०-५-५ ||

हरिसंकल्प मुळीचा |आत्माराम सकळांचा | संकेत नामाभिधानाचा | येणे प्रकारे || २०-५-६ ||
निश्चळी चंचळ घेतले | म्हणौनि चैतन्य बोलिले | गुणसमानत्वे जाले |गुणसाम्य ऐसे || २०-५ -७ ||

अर्धनारीनटेश्वर | तोचि षड्गुणेश्वर | प्रकृतीपुरुषाचा विचार | शिवशक्ती ||२०-५-८ ||

शुध्दसत्वगुणांची मांडणी | अर्धमात्रा गुणक्षोभिणी | पुढे तिही गुणांची करणी | प्रगट जाली || २०-५-९ ||

मन माया अंतरात्मा | चौदा जिनसांची सीमा | विद्यमान ज्ञानात्मा |इतुके ठाई || २०-५-१० ||

परब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ स्फुरण झाले ,त्याला मूळमाया म्हणतात .मूळमायेची अनेक सूक्ष्म रूपे आहेत .मूळमाया अत्यंत सूक्ष्म असून ती मिश्रणमय आहे ,निर्भेळ नाही .या मुळच्या संकल्पाला हरिसंकल्प म्हणतात .तोच सर्वांच्या अंतर्यामी वास करणारा आत्माराम किंवा अंतरात्मा .निश्चळ ब्रह्मात चैतन्य जागे झाले ,म्हणून त्याला चैतन्य म्हणतात .त्रिगुणांचे प्रमाण सम असते म्हणून गुणसाम्य म्हणतात .अर्धनारीनटेश्वर ,षडगुणेश्वर ,शिवशक्ती ,प्रकृती पुरुष ,शुध्दसत्वगुणाची कल्पना ,अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी ,गुणक्षोभिणीतून प्रगट झालेले सत्व ,रज ,तम गुण ,मन माया अंतरात्मा ,ही सर्व मूळमायेचीच नावे आहेत .पंचमहाभूते हा तिसरा जिन्नस आहे .

येथे पाहातां जाणीव थोडी | आदिअंत हे रोकडी | खाणी निरोपिल्या तांतडी | तो चौथा जिन्नस ||२०-५-१२ ||

च्यारी खाणी अनंत प्राणी | जाणीवेची जाली दाटणी | च्यारी जिनस येथूनी | संपूर्ण जाले || २०-५-१३ ||

पंचभूतामध्ये जाणीवेचा अंश कमी प्रमाणात असतो पण त्याच्या आधी व नंतर म्हणजे

पंच महाभूते उत्पन्न होण्याआधी व उत्पन्न झाल्यावर जाणीवेचे अस्तित्व असते .चार खाणीत

अनंत प्राणी आहेत .त्या प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीवेची गर्दी झालेली असते .

1 comment:

Anonymous said...

as konitari havech ahe jo atyadhunik pranalinchya madhyamatun prachar v prasar karun samajatalya talagalatil lokanparyant samarth sahity pochata karel to tumachya madhyamatun hotoy he prakarshane kanavat ahe tumhala khup khup shubhechha
jay jay raghuveer samarth