Friday, September 9, 2011

महंताचे राजकारण

महंताने राजकारण कसे करावे ?

महंत लोकसंग्रह करत असताना समाजातली भिन्न प्रकृतीची ,भिन्न पातळीची ,भिन्न आवाक्याची माणसे एकत्र येतात .त्या सर्वांकडून काहीतरी कार्य करवून घेण्याच्या क्रियेला श्रीसमर्थ राजकारण म्हणतात .राजकारण करताना त्यांच्या महंताने कसे वागावे ते समर्थ सांगतात :

ज्ञानी आणि उदास | समुदायाचा हव्यास | तेणे अखंड सावकाश |एकांत सेवावा || १९-९-१ ||

जेथे तजविजा कळती | अखंड चाळणा निघती | प्राणीमात्राची स्थिती गती | कळो येते || १९-९-२ ||

आत्मज्ञानी ,उदास अलिप्त वृत्ती असलेला पुरुष असेल व त्याला लोकसंग्रहाची आवड असेल तर त्याने लोकसंग्रह तर करावाच पण एकांतही सेवावा . त्याने अनेक योजना सुचतात ,अनेक उपाय सुचतात ,कार्य योग्य दिशेने चालले आहे की नाही ,लोकांची परिस्थिती कशी बदलता येईल या सर्व गोष्टी एकांतात सुचतात . परमेश्वराशी अनुसंधानही साधता येते .

जेणे जे जे मनी धरिले | ते ते आधीच समजले | कृत्रिम अवघेचि खुंटले | सहजची येणे || १९-९ -५ ||

अखंड राहतां सलगी होते | अति परीचये अवज्ञा घडते | याकारणे विश्रांती ते |घेता नये || १९-९-६ ||

आळसे आळस केला | तरी मग कारबारचि बुडाला | अंतरहेत चुकत गेला | समुदायाचा || १९-९-७ ||

श्रीसमर्थांचा महंत ज्ञानी आहे त्यामुळे दुस-याच्या मनात काय चालले आहे ते तो ओळखतो .त्यामुळे तो स्वत:चे व समाजाचे रक्षण करू शकतो .त्याचबरोबर श्रीसमर्थ महंताला सावध करतात की एकां ठिकाणी जास्त दिवस महंत राहिला तर अतिपरिचयात अवज्ञा अशी स्थिती होते .मग मान रहात नाही .म्हणून महंताने एकाच ठिकाणी विश्रांती घेत राहू नये असे समर्थ सांगतात .फिरण्याचा ,कामाचा आळस केला ,तर कारभार नाश पावतो .कार्याचा नाश होतो .लोकसमुदायाला कार्यरत ठेवण्याचा उद्देश तसाच राहतो .म्हणून महंताने आळस टाकावा .नित्यनियमाने करण्याची उपासनेची कामे लोकांच्या मागे लावावी ,म्हणजे त्यांना वाईट वागायला सवड मिळणार नाही .असे समर्थांचे महंतांना सांगणे आहे .

लोकांकडून काम कसे करवून घ्यावे ,त्यांची वृत्ती कशी पालटावी ,याचे मार्गदर्शन समर्थ करतात .

चोर भांडारी लावावा | घसरताच सांभाळावा | गोवा मूर्खपणाचा काढावा | हळू हळू || १९-९ -९ ||

कांटीने कांटी झाडावी | झाडावी परी ते कळों नेदावी | कळकटेपणाची पदवी |असो द्यावी ||१९-९-१२ ||

न कळतां करी कार्य जे ते | ते कामचि तत्काळचि होते | गचगर्तेत पडतां ते |चमत्कार नव्हे ||१९-९-१३ ||

चोरालाच भांडारावर मुख्य नेमावा .त्याने त्याच्यावर भांडाराचे रक्षण करण्याची वेळ येते .चोरीचा तो विचारच करू शकत नाही .समजा चोरी केलीच तर त्याला क्षमा करून सांभाळून घ्यायला समर्थ सांगतात .जो नष्ट असेल तर त्याच्या मुकाबल्यात नष्ट आणून उभा करावा .वाचाळा समोर वाचाळ आणून उभा करावा .आपल्या संबंधी दुस-याच्या मनात संशय निर्माण होईल असे करू नये .त्यासाठी कार्य लोकांकडून करवून घेताना महंताने अलिप्त असावे .समर्थ म्हणतात की काट्याने काटा काढावा .म्हणजे दुर्जनांचा बंदोबस्त दुर्जनांकडून करावा .पण ते कोणी केले हे लोकांना कळू नये .

ऐकोनी आवडी लागावी | देखोनी बळकटी व्हावी | सलगीने आपली पदवी | सेवकामध्ये || १९-७-१४ ||

कोणीयेक काम करितां होते | न करीता ते मागे पडते | याकारणे ढिलेपण ते | असोचि नये ||१९-७-१५ ||

जो दुस-यावरी विश्वासला | त्यांचा कार्यभाग बुडाला | जो आपणचि कष्टत गेला | तोचि भला ||१९-७-१६ ||

महंत असा असावा की त्याची कीर्ती दूरवर पसरावी .त्याला प्रत्यक्ष बघून त्याच्याबद्दल श्रध्दा बळकट व्हावी .आपण त्याच्या गटातले आहोत या बद्दल लोकांना अभिमान वाटावा .म्हणून महंताने आपले काम चालू ठेवावे .कारण काम चालू ठेवले नाही तर ते काम थांबते .आपले काम आपण स्वत: करावे .कारण जो दुस-यावर आपल्या कामासाठी अवलंबून राहतो त्याचे काम नासते .म्हणून समर्थ सांगतात :

मुख्य सूत्र हाती घ्यावे | करणे ते लोकांकरवी करवावे | कित्तेक खलक उगवावे | राजकारणामध्ये || १९-७-१८ ||

कार्याचे मुख्य सूत्र आपल्या हातात ठेवावे .पण कार्य मात्र लोकांकडून करवून घ्यावे .कार्य करताना अनेक लोकांना पुढे आणून कार्यकर्ता बनवावे .गांवगुंडांना हैराण करून नरम करावे .त्यांना आपलेसे करावे .त्यांना नाहीसे करू नये .

दुर्जन प्राणी समजावे |परी ते प्रगट न करावे | सज्जनापरीस आळवावे | महत्व देऊनी || १९-७ -२३ ||

हे धूर्तपणाची कामे | राजकारण करावे नेमे | ढिलेपणाच्या संभ्रमे |जाऊ नये || १९-७-२७ ||

कोठेच पडेना दृष्टी |ठाई ठाई त्याच्या गोष्टी | वाग्विलासे सकळ सृष्टी | वेधिली तेणे || १९-७-२८ ||

जैसास तैसा जेव्हा भेटे | तेव्हा मज्यालसी थाटे | इतुके होते परी धनी कोठे |दृष्टीस न पडे || १९-७-३१ ||

समाजातली दुर्जन माणसे ओळखली तरी ती दुर्जन आहेत असे प्रगट पणे बोलू नये .नाहीतर कायमची कटकट सुरु होते .म्हणून महंताने राजकारण व्यवस्थित करावे .ढिले पणे वावरू नये .लोकांच्या दृष्टीस न पडता याच्या ब्बद्दल लोकांनी चर्चा करावी असे काम त्याने करावे .असा महंत आपल्या वक्तृत्वाने लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतो .असे राजकारण महंताने करावे .असे समर्थ सांगतात .

No comments: