Wednesday, September 21, 2011

मूळमायेचे १४ संकेत

मूळमायेचे चौदा संकेत कोणते ?

मूळमायेचे चौदा संकेत असे आहेत :

१ सत्व २ रज ३ तम ४ गुणक्षोभिणी ५ शुध्द सत्व ६ शिवशक्ती ७ प्रकृती पुरुष ८ षड्गुणैश्वर ९ अर्धनारीनटेश्वर १० गुणसाम्य ११ चैतन्य १२ मन १३ माया १४ अंतरात्मा

मूळमायेचे १४ संकेत पाहाण्याआधी प्रथम मूळमाया म्हणजे काय ते पाहिले पाहिजे .

मूळमाया तोचि पुरुष | तोचि सर्वांचा ईश | अनंतनामी जगदीश | तयासीच बोलिजे ||८-३-२० ||

मूळपुरुष जो ईश आहे त्याची मूळमाया ही शक्ती आहे .अनंत शक्तीने युक्त असणारा ईश्वर तोच मूळपुरुष आहे .मूळमाया हे त्या मूळपुरुशाचे दुसरे नाव आहे .केवल ज्ञानमय व शक्तीमय चैतन्याला देव किंवा परमेश्वर म्हणतात .त्याच्या ज्ञानमय अंगास मूळपुरुष व चैतन्यमय अंगास मूळमाया म्हणतात . मूळमाया व मूळपुरुष एकच .

मूळमाया निराकार ब्रह्मात कशी निर्माण झाली ?

आकाश असता निश्चळ | मध्ये वायो झाला चंचळ | तैसी जाणावी केवल |मूळमाया || ८-३-२७ ||

आकाश निश्चळ असताना ,चंचळ वायू उत्पन्न झाला .वायू उत्पन्न झाल्यावर आकाश न हालता जसेच्या तसे राहते .त्याप्रमाणे निराकार ,निश्चल परब्रह्मात मूळमाया निर्माण झाली तरी परब्रह्माच्या निर्गुण पणात भंग होत नाही .

वायू व मूळमायेत साम्य काय आहे ?

८-३-३० ते ८-३-३८ या ओव्यांमध्ये श्रीसमर्थांनी वायू व मूळमायेत साम्य दाखवले आहे .वायू ज्याप्रमाणे पुरातन नाही ,त्याप्रमाणे मूळमायाही पुरातन नाही .वायू आकाशात लीन होतो त्याप्रमाणे मूळमाया परब्रह्मात लीन होते .वायू प्रमाणे मूळमाया आहे .वायू भासतो पण दिसत नाही ,तसे मूळमायेचे कर्तुत्व भासते पण ती दाखवता येत नाही .मूळमाया दृश्य पदार्थांच्या रूपाने माया व अविद्या दिसते .वायूने दृश्य वस्तू आकाशात उडतात त्याप्रमाणे मूळमायेच्या संयोगाने निर्गुण ब्रह्मात दृश्य जग दिसते .मूळ परब्रह्म अदृश्य ,निराकार ,निर्गुण ,सूक्ष्म आहे .त्यात उत्पन्न झालेली मूळमाया त्या सद्वस्तूला दृश्य ,साकार ,सगुण ,स्थूल पदार्थांच्या रूपाने दाखवते .ज्याप्रमाणे आकाश ढग येऊनही ढग नाहीसे झाल्यावर जसेच्या तसे असते त्याप्रमाणे मूळमाया प्रगट झाल्यावर परब्रह्म सगुण साकार झाल्यासारखे वाटते .पण परब्रह्म मात्र जसेच्या तसे निर्गुण असते .ज्याप्रमाणे पर्वत दुरून निळे वाटतात ,प्रत्यक्षात पर्वत निळे नसतात ,त्याप्रमाणे दृश्य विश्व परब्रह्माला चिकटल्या सारखे वाटते .पण निर्गुण परब्रह्म दृश्य विश्वापासून अलिप्त असते .

मूळमायेला ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणतात .मूळमायेतील जाणीव तो ईश्वर असतो .त्याची पुल्लिंगी नावे समर्थ सांगतात .

परमात्मा परमेश्वरु | परेश ज्ञानघन ईश्वरू | जगदीश जगदात्मा जगदेश्वरु |पुरुषनामे ||१०-१०-१६ ||

सत्तारूप ज्ञानस्वरूप |प्रकाशरूप जोतीस्वरूप | कारणरूप चिद्रूप | शुध्द सूक्ष्म अलिप्त ||१०-१०-१७ ||
आत्मा अंतरात्मा विश्वात्मा | द्रष्टा साक्षी सर्वात्मा | क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा | देही कूटस्थ बोलिजे ||१०-१०-१८ ||

इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरीहरात्मा | येमात्मा धर्मात्मा नैरुत्यात्म्मा |वरुणवायूकुबेरात्मा | ऋशीदेवधर्ता मुनीधर्ता ||१०-१०-१९ ||
मूळमायेची स्त्रीवाचक नावे पुढीलप्रमाणे :

मूळमाया जगदेश्वरी |परमविद्या परमेश्वरी | विश्ववंद्या विश्वेश्वरी | त्रैलोक्य जननी ||१०-१०-२३ ||

अंतर्हेतू अंतर्कळा |मौन्यगर्भ जाणीवकळा | चपळ जगज्जोती जीवनकळा | परा पश्यति मध्यमा ||१०-१०-२४ ||

मूळमाया युक्ती ,बुद्धी ,मति ,धारणा ,सावधानता ,शोधकबुद्धी ,भूत ,भविष्य वर्तमान उलगडून दाखवते . जागृती ,स्वप्न ,सुषुप्ती या अवस्था ती जाणते .तुर्या ,तटस्थ अवस्था ती जाणते .ती अतिशय कठोर आहे तशीच ती अत्यंत कोमलही आहे .प्रेमळ आहे .तशीच ती अतिशय रागीट आहे .कमालीची मायाळू आहे .क्षमा ,शांती ,विरक्ती ,भक्ती ,अध्यात्मविद्या ,सायुज्यमुक्ती ,सूक्ष्म विचार करण्याची शक्ती ,सहजस्थिती तिच्याच कृपेने प्राप्त होते .

मूळमायेची नंपुसक नावे :

जाणणे अंत:कर्ण चित्त | श्रवण मनन चैतन्य जीवित | येते जाते सुचित |होऊन पाहा ||१०-१०-३० ||
मीपण तूपण जाणपण | ज्ञातेपण सर्वज्ञपण |जीवपण शिवपण ईश्वरपण | अलिप्तपण बोलिजे ||१०-१०-३१ ||

वायू ,जाणीव व जगज्जोती यांच्या मेळाव्याला मूळमाया म्हणतात .

No comments: