Wednesday, September 21, 2011

परब्रह्माची भेट कशी घ्यावी ?

परब्रह्म सर्वत्र व्यापून आहे .तरीही आपल्याला ते दिसत नाही .समजत नाही .त्यासाठी काय करावे ? असा प्रश्न श्रोते विचारतात .

मूळमाया नस्तां चंचळ | निर्गुण ब्रह्म ते निश्चल | जैसे गगन अंतराळ | चहुकडे ||२०-२-१ ||

दृश्य आले आणि गेले | परी ते ब्रह्म संचले | जैसे गगन कोंदाटले | चहुकडे ||२०-२ -२ ||

जिकडे पाहावे तिकडे अपार | कोणेकडे नाही पार | येकजिनसी स्वतंत्र | दुसरे नाही ||२०-२ -३ ||

दृश्य विवेके काढिले | मग परब्रह्म कोंदाटले | कोणासीच अनुमानले |नाही कदा ||२०-२ -५ ||

अधोर्ध पाहांता चहुकडे | निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे | मन धावेल कोणेकडे | अंत पाहावया ||२०-१-६ ||

दृश्य चळे ब्रह्म चळेना | दृश्य कळे ब्रह्म कळेना | दृश्य आकळे ब्रह्म आकळेना | कल्पनेसी ||२०-१-७ ||

ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र दिसते ,तसेच चंचळ मूळमाया उत्पन्न होण्यापूर्वी निश्चळ ब्रह्म सर्वत्र कोंदाटले होते .मूळमाया ,गुणमाया उत्पन्न झाल्यावर त्रिगुण निर्माण झाले .अष्टधा प्रकृती निर्माण झाली .दृश्य विश्व निर्माण झाले .दृश्य नाशवंत असल्याने ते येते आणि जाते .पण निश्चळ परब्रह्म मात्र तसेच राहाते . आकाशाप्रमाणे परब्रह्म सर्वत्र साठलेले असते .कोठूनही ज्ञानी परब्रह्माकडे पाहतात तेव्हा ते सर्व बाजूंनी अपार ,अनंत एकजिनसी ,स्वतंत्र असते .

ब्रह्म पाहण्यासाठी मात्र विवेक करावा लागतो . विवेकाने ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे लागते म्हणजे ब्रह्मांड झालेच नाही अशी कल्पना करावी लागते .मग फक्त आकाशच आकाश आहे अशी कल्पना करावी लागते .नित्य काय अनित्य काय असा नित्यानित्य विवेक करून दृश्यच नाहीसे केले तर परब्रह्म सर्वत्र भरले आहे असा अनुभव येईल .दृश्याची आपण कल्पना करू शकतो ,पण परब्रह्माची मात्र कल्पना करता येत नाही .

मग श्रोते प्रश्न विचारतात परब्रह्माला कसे जाणून घ्यायचे ?

समर्थ सांगतात :

परब्रह्माला जाणून घ्यायचे मार्ग दोन : पिपीलिका मार्ग ,विहंगम मार्ग

त्यासाठी श्रवणभक्ती हाच एक मार्ग आहे . सतत चिंतन करून दृश्य ओलांडून निश्चळ परब्रह्माची गाठ घ्यावी .

परब्रह्मायेव्हडे थोर नाही | श्रवणा परते साधन नाही | कळल्यावीण कांहीच नाही | समाधान ||२०-२ -९ ||

पिपीलिका मार्गे हळू हळू घडे | विहंगमे फळासी गाठी पडे | साधक मनी पवाडे | म्हणिजे बरे || २०-२-१० ||

खरे तर परब्रह्मा एव्हडी श्रेष्ठ वस्तू नाही .श्रवणा सारखे दुसरे साधन नाही .त्या परब्रह्माचे आकलन होण्यासाठी श्रवण व मनन हेच साधन आहे ..परब्रह्माचे ज्ञान होण्यासाठी पिपीलिका व विहंगम असे दोन मार्ग आहेत .पिपीलिका म्हणजे मुंगी .मुंगीच्या पावलाने म्हणजे हळूहळू जाणारा मार्ग .विहंगम म्हणजे पक्ष्याप्रमाणे चटकन फळाप्रमाणे जाणारा मार्ग .या मार्गात साधक एकदम सूक्ष्मात शिरतो .आपल्या सारखा सामान्य साधक पिपिलीकेचा मार्ग धरतात . तर तुलसीदासां सारखा एकां क्षणी विषय ,मोह ,संसार सोडणारा विहंगम मार्गाने परब्रह्मा पर्यंत पोहोचतो .

No comments: