Sunday, April 18, 2010

परमात्म्याचे लक्षण कोणते ?

मोक्ष सत्संगतिने मिळतो हे सांगताना समर्थ सांगतात :
मागा जाले निरूपण परमात्मा तो तूचि जाण तया परमात्म्याचे क्षण ते हे ऐसे असे --
जन्म नाही मृत्य नाही येणे नाही जाणे नाही बध्द मोक्ष दोनी नाही परमात्मयासी - -
परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा - -
परमात्मा सर्वांस व्यापक परमात्मा अनेकी येक परमात्मयाचा विवेक अतर्क्य आहे - -
सत्संगतीने स्वानंदघन आत्मा तो मीच आहे ,परब्रह्म तो मीच आहे .आपण मूळ परमात्मस्वरूपच आहोत
असे कळते.परमात्म्याला जन्म नाही मृत्यु नाही ,जाणे नाही येणे नाही ,तो असतची असे अशा स्थितीत असतो .हे दृश्य जग उत्पन्न होण्यापूर्वी ,उत्पन्न झाल्यावर दृश्य जग नाहिसे तो परमात्मा असतोच असतो .
परमात्म्याने सर्व जग व्यापून टाकलेले असते .तो अनेकांमध्ये एकपणाने राहतो .पण परमात्मा नक्की कसा आहे हे तर्काने कळत नाही पण भक्तीने मात्र प्राप्त होते .नवविधा भक्तीचे सार जे आत्मनिवेदन ,त्या भक्तीने परमात्मा अनुभवास येतो असे समर्थ सांगतात ,म्हणून श्रोता प्रश्न विचारतो :
आपणास कैसे निवेदावे कोठे जाऊन पडावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे - -३१
समर्थ उत्तर देतात ;
आत्मनिवेदनाचे क्षण आधी पाहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो वोळखावा - -१३
प्रथम मी कोण याचा शोध घेणे म्हणजे आत्मनिवेदन !मग परमात्मा निर्गुण कसा आहे ते जाणावे .मी कोण आहे असा विचार केला तर लक्षात येते की हा स्थूल देह जो पंचमहाभूतांचा आहे तो नाशिवंत आहे कारण यद् दृष्टं तं नष्टं असे श्रुतीचे वचन आहे म्हणून स्थूल देह म्हणजे मी नाही .
मन बुध्दी चित्त अंत :करण अहंकार हे सर्व सूक्ष्म देहाचे घटक आहेत ते सर्व विचारांचे तरंग .तेही देह नाश पावला की वायूरूपाने शरीराबाहेर पडतात म्हणजे सूक्ष्म देह मी नाही .
कारण महाकारण देह ह्या अनुक्रमे अज्ञान ज्ञानाच्या अवस्था !म्हणजे ते देहही मी नाही .मग मी कोण असा विचार केला तर आपल्या मध्ये जे चैतन्य असते ,जे सर्व कार्य घडवून आणणारी जी चित्कला म्हणजे आत्मा आहे तो खरा मी आहे असा विचार करून स्थूल देहावरील आसक्ती नाहीशी करायची .देह्बुध्दी टाकून द्यायची .
समर्थ म्हणतात :
देवभक्ताचे शोधनकरिता होते आत्मनिवेदनदेव आहे पुरातनभक्त पाहे । । - -१४ । ।
देव कसा आहे ,देव आणि भक्त यांचा संबंध कसा आहे यांचा शोध केला की आत्मनिवेदन आपोआप घडते कारण तो शोध करत असताना देव शाश्वत आहे आपण शाश्वत नाही हे भक्ताला समजते .देवाला ओळखता ओळखता भक्त देवाशी एकरूप होतो त्यांच्यातले वेगळेपण संपते ,देवभक्त असे वेगळेपण उरत नाही म्हणून भक्ताची व्याख्या करण्यासाठी समर्थ म्हणतात :
विभक्त नाही म्हणो भक्तबध्द नाहीं म्हणोनि मुक्तअयुक्त नाही बोलणे युक्तशास्त्राधारे । । - -१६ । ।
भगवंता पासून विभक्त नाही म्हणून तो भक्त .त्याला कोणतेही बंधन नाही म्हणून तो मुक्त आहे .जेव्हा देव भक्ताचे मूळ स्वरुप आपण पहायला जातो तेव्हा दोघांमधील भेद नाहिसा होतो आणि दृश्याहून वेगळा असा परमात्मा शिल्लक उरतो .त्या परमात्म्याशी एकरूपता साधते .कोणतेही द्वैत उरत नाही.मी तू पणा उरत नाही .देव भक्त एकरूप झाल्याने अभेद भक्तीची अवस्था प्राप्त होते .त्यासाठी संताला किंवा सद्गुरुला शरण जावे लागते .ज्याप्रमाणे नदी सागराला जावून मिळते तेव्हा तिला सागरापासून वेगळे काढता येत नाही किंवा परिस स्पर्श झाल्यावर
लोखंडा चे सोने झाल्यावर जसे काळे पडत नाही त्याप्रमाणे जो भगवंताशी एकरूप होतो तेव्हा मी पणाने वेगळा राहत नाही .तोच त्याचा मोक्ष असतो .

No comments: