Sunday, August 8, 2010

सार विवेक म्हणजे काय ?

ज्याप्रमाणे आपण केळीचे साल सोलून आतील गर खातों ,राजहंस ज्याप्रमाणे नीरक्षीर विवेक करतो ,दूध पाणी एकत्र केलेले असेल तर दूध घेतो ,त्याप्रमाणे श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधात मूर्ख लक्षण [द .२ स.१ ] ,कुविद्या लक्षण [द.२ स .३ ] ,रजोगुण लक्षण [द २ स ५ ] ,तमोगुण लक्षण [द २ स ६ ] ,पढ़त मूर्ख लक्षण [द २ स १० ] अशा सारखे असाराचे समास [त्याग करण्यास योग्य ] समास दिले आहेत .त्यातील लक्षणे आपल्या अंगी असतील ती काढून टाकायची आहेत .तर उत्तम लक्षण [द २ स २ ] ,सद्विद्या निरूपण [द २ स ८ ] ,विरक्त लक्षण [द २ स ९ ] अशा सारखी ग्रहणाची लक्षणे आहेत .सार लक्षणे सांगितली आहेत .त्याप्रमाणे सारविवेक करायचा म्हणजे काय करायचे ?
खरा देव कोणता याविषयी सांगताना समर्थ द ११ स ४ या समासात सांगतात :
ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार । विकार नाही निर्विकार । तेचि ब्रह्म । । ११-४-१
अत्यंत निराकार व निर्विकार असे ब्रह्म आहे .ब्रह्म शाश्वत आहे पण तो दृष्टा व केवळ साक्षी आहे .तो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो व त्यांचे पालन करतो ।
देव या सकळांचे मूळ । देवास मूळ ना डाळ । परब्रह्म ते निश्चळ । निर्विकारी । । ११-४-८
अंतरात्मा कर्माचे व दृष्याचे मूळ आहे .प्रकृतीमुळे अस्तित्वात आलेल्या आत्म्याला खरे अस्तित्व नाही .कारण अंतरात्मा चंचळ आहे म्हणून समर्थ म्हणतात :
निर्विकारी आणि विकारी । येक म्हणेल तो भिकारी । विचाराची होते वारी । देखत देखतां । । ११ -४ -९
म्हणून निर्विकारी व विकारी अंतरात्मा एकच आहे .असे जो म्हणतो त्याला समर्थ भिकारी म्हणतात .कारण त्याने सारविवेक केला नाही ।
जो येकची विस्तारीला । तो अंतरात्मा बोलिला । नाना विकारी विकारला । निर्विकारी नव्हे । । ११-४-१५
एकच अंतरात्मा विश्वरूपाने विस्तारला अशा प्रकारच्या भेदांनी ,बदलांनी विलसणारा अंतरात्मा निर्विकारी ब्रह्म नव्हे .म्हणजे थोरल्या देवाची निवड हाच सार विवेक आहे .समर्थांनी ज्ञानाची व्याख्या केली आहे :
घेव ये तेचि घ्यावे । घेव न ये ते सोडावे । उंच नीच वोळखावे । त्या नाव ज्ञान । । ११-४-२४
जे घेण्यास योग्य आहे ते घ्यावे ,घेण्यास योग्य नाही ते सोडून द्यावे .म्हणून आपल्या कल्याणाचे जे आहे ते घेऊन सार घ्यावे असार टाकावे .

No comments: