Tuesday, August 10, 2010

महन्त लक्षण

श्री समर्थांचा महंत हा अध्यात्मिक पुढारी आहे .श्रीरामचंद्र महंतांचा आदर्श आहे .जसे एखादे कमल पूर्ण पणे विकसित झाल्यावर सुंदर दिसते ,तसा समर्थांचा महंत असावा ,त्याचे जीवन सर्व बाजूंनी विकसित झालेले असावे अशी समर्थांची महंतांकडून अपेक्षा होती .सर्व बाजूंनी विकसित याचा अर्थ आचार ,विचार ,उच्चार प्रचार ,व्यवहार व परमार्थ या सहाही अंगांनी विकसित असावे .तसेच त्याचे लेखन,वाचन व पाठांतर चांगले असावे .म्हणून महंताने काय काय करावे ते समर्थ सांगतात :
शुध्द नेटके लिहावे । लेहोन शुध्द शोधावे । शोधून शुद्ध वाचावे । चुको नये । । ११-६-१
विश्कळीत मातृका नेमस्त कराव्या । धाट्या जाणोंन शुद्ध कराव्या । रंग राखोन भराव्या । नाना कथा । । ११-६-२
शुद्ध नेटके लिहावे ,लिहून झाले की तापासावे ,शुद्ध वाचावे , कान्हा मात्रा नीट लिहाव्या .लिहिण्याची पध्दत पहिल्या पासून शेवट पर्यंत सारखी ठेवावी .आत्मज्ञानाचा विचार ,जरूर तेव्हडे राजकारण ,चार चौघात कसे वागावे ,याची जाण महंतांना असावी अशी अपेक्षा समर्थांची महन्तांकडून होती .समर्थ म्हणतात ;
पुसो जाणें सांगो जाणें । अर्थांन्तर करो जाणे । सकलिकांचे राखो जाणे । समाधान । । ११-६-५
दीर्घ सूचना आधी कळे । सावधपणे तर्क प्रबळे । जाणजाणोनि निवळे । यथायोग्य । । ११-६-6 । ।
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुध्दीमंत । यावेगळे अन्तवंत । सकल काही । । ११-६-७
कोणाला काय विचारायचे ,काय सांगायचे ,ग्रंथाचा अर्थ बरोबर कसा काढायचा ,सर्वांचे समाधान कसे राखायाचे ,हे ज्याला कळते ,पुढे काय घडेल याचा अंदाज जो बरोबर बांधतो ,तो खरा महंत ! काळ वेळ ,तानमान प्रबंध ,कविता ,महत्वाची वचने ,सभाधीटपणा ज्याला वेळेवर सुचतात ,त्याला एकांत
आवडतो .तो आधी पाठांतर करतो ,ग्रंथाच्या अंतरंगात शिरतो ,खोल अर्थ शोधतो ,तोच खरा महंत !
आधिच सीकोन जो सिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी । गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळे । । ११-६-१०
जो आधी शिकतो ,मग लोकांना शिकवतो ,तो श्रेष्ठ पदवी पावतो ।

त्याची वर्तणुक कशी असते ?
अक्षर सुंदर वाचणे सुंदर । बोलणे सुंदर चालणे सुंदर । भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर । करून दावी । । ११-६-११
सांकडी मध्ये वर्तो जाणे । उपाधी मध्ये मिळों जाणे । अलिप्त पणे राखो जाणे । आपणासी । । ११-६-१३
आहे तरी सर्वां ठाईं । पाहों जाता कोठेच नाही । जैसा अंतरात्मा ठाईंचा ठाई । गुप्त जाला । । ११-६-१४
महंताचे अक्षर सुंदर असते ,वाचणे सुंदर असते ,बोलणे सुंदर असते .चालणे सुंदर असते .भक्ती ज्ञान ,वैराग्य सुंदर असते .कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देतो .संकटात कसे वागावे ते तो जाणतो ,व्यापा मध्ये कसे समरस व्हावे ,हे सुध्दा त्याला समजते .या सर्व व्यापांतून अलिप्त कसे रहायचे ती कलाही त्याच्या जवळ असते .अंतरात्मा ज्याप्रमाणे सर्वत्र असतो ,सर्वां मध्ये वास करतो ,पण कोठेच दिसत नाही ,पहायला गेले तर सापडत नाही ,तसा महंत सर्वां मध्ये मिसळतो पण शोधायला गेले तर कोठेच सापडत नाही .एकदम नाहीसा होतो .एकांकात जातो .ज्याप्रमाणे अंतरात्मा सर्व जीवांना प्रेरणा देणारा आहे ,पण तो दिसत नाही .तसा महंत सामाजिक चळवळ सुरु करून देतो पण स्वत : अलिप्त राहतो ।
तो नीति न्याय यांचे रक्षण करतो .स्वत : अन्याय ,अनीती करत नाही .इतरांना करू देत नाही .कठीण प्रसंगातून पार पडण्यासाठी प्रयत्न करतो ।
ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा । दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा । । ११-६-१९
समर्थांचा महंत मनोबलाचा पुरुष आहे .तो पुष्कळ लोकांचा आधार आहे .अत्यंत मनोबल व पुष्कळांचा आधार असणे हा श्रीरामांचा गुण आहे .तो महंताने घ्यावा असे समर्थ म्हणतात .

No comments: