Tuesday, August 17, 2010

परमात्मा कसा आहे ?

नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोका पूजा धरुनी प्रेमा । ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे । । ११-९-६
ज्या देवाच्या प्रतिमेची आपण पूजा करतो तो देव कसा आहे ? असा प्रश्न श्रोते विचारतात तेव्हा समर्थ म्हणतात :
प्रतिमेची पूजा करून आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रगट होतो .अवतारी पुरुषांमध्ये अंतरात्मा प्रगट होतो .आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रगट करणे ,जागा करणे हे काम देवपूजा करते .प्रतिमा हे मनाचे आलंबन ,किंवा आधार असतो .समर्थ म्हणतात :
देह्पुरामध्ये ईश । म्हणोन तया नाव पुरुष । जगामध्ये जगदीश । तैसा ओळखावा । । ११-९-१२
जाणीवरूपे जगदांतारे । प्रस्तुत वर्तती शरीरे । अंत :करण विष्णू येणे प्रकारे । वोळखावा । । ११-९-१३
तो विष्णू आहे जगदांतरी । तोचि आपुले अंतरी । कर्ता भोक्ता चतुरी । अंतरात्मा वोळखावा । । ११-९-१४
अंतरात्मा या देहरूपी नगरीत राहतो .म्हणून त्याला पुरुष म्हणतात .तसेच जगात राहणारा आत्मा तो जगदीश
असतो .जगात शुध्द जाणीव असते .ती सर्व शरीरांना हालाचालींची ,स्वसंरक्षणाची , शरीर पोषणाची प्रेरणा देते .ती जाणीव म्हणजेच विष्णू ,म्हणजेच विश्वाचे अंत :करण असते .जगात असलेली शुध्द जाणीव आपल्या अंत :करणात असते .हा अंतरात्माच खरा भोक्ता व कर्ता असतो .समर्थ म्हणतात :
येकची जगाचा जिव्हाळा । परी देह्लोभाचा अदाताळा । देहामध्ये वेगळा । अभिमान धरी । । ११-९-१६
जगाचे अंत :करण एकच आहे पण देहाच्या आसक्ती मुळे आपल्या तसे अनुभवास येत नाही .देहाच्या सबंधाने माणूस स्वत :ला वेगळा मानतो ,त्याचा अभिमान धरतो .मी देह आहे या अभिमानाने वेगळेपणाचे जीवन जगतो .जशा सागरावर लाटा येतात ,तशा जाणीव रूपी सागरावर देहाच्या अनंत लाटा येतात व जातात .प्राण्याचा देह उपजतो ,वाढतो ,मरतो .तशी अंतरात्म्याच्या सागरात पुष्कळ विश्वे निर्माण होतात व लय पावतात .समर्थ पुढे सांगतात :
त्रैलोका वर्तावितो येक । म्हणौन त्रैलोक्य नायेक । ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना कैसा । । ११-९-१८
या प्रचंड त्रैलोक्याला चालवतो म्हणून अंतरात्म्याला त्रैलोक्य नायक म्हणतात .असा हा अंतरात्मा अचाट असला तरी मायेच्या कक्षात येतो ,त्यासाठी देहामधील त्याचे स्वरुप ओळखावे ,मग जगातील स्वरुप जाणावे , मग शेवटी निर्मल ,निर्विकार परब्रह्म जाणावे व अनुभवावे असे समर्थ सांगतात .त्यासाठी समर्थ एक उपाय सांगतात :
अष्टदेह थानमान । जाणोंन जालिया नीर्शन । पुढे उरे निरंजन । निर्मळ ब्रह्म । । ११-९-२३
विचारेचि अनन्य जाला । पाहाणाराविण प्रत्यय आला । तेही वृत्ती निवृत्तीला । बरे पहा । । ११-९-२४
पिंड ब्रम्हांडाच्या आठ देहांचा व स्थल कालांनी व्यापलेल्या दृश्य विश्वाचा लय केला की निरंजन व शुध्द ब्रह्म मिळते .त्यासाठी समर्थ सांगतात की साधक जर अखंड चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य झाला तर त्याचा मीपणा नाहीसा होतो .त्याला आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो .अनुभव येणे ही सुध्दा वृत्तीच असते .अनुभव घेण्याच्या वृत्तीचाही लय होतो .वृत्ती नाहीशी होते .स्वरूपाचा अनुभव येतो .

No comments: