Monday, August 30, 2010

अचूक यत्न कोणता ?

बरे खावे बरे जेवावे । बरे ल्यावे बरे नसावे । मनासारिखे असावे । सर्व काही । । १२-२-३
ऐसे आहे मनोगत । तरी ते काहीच न होत । बरे करिता अकस्मात । वाईट होते । । १२-२-४
येक सुखी येक दु:खी । प्रत्यक्ष वर्तते लोकी । कष्टी होऊनिया सेखी । प्रारब्धा वरी घालिती । । १२ -२- ५
अचूक यत्न करवेना । म्हणौनि केले ते सजेना । आपला अवगुण सजेना । कांही केल्या । । १२ -२ -६
संसारी स्त्री पुरुषांना सर्वांना असे वाटते की आपल्या मना सारखे सगळे चांगले असावे .परन्तु असे असत नाही .जे दु :खी असतात ते कष्टी होतात .आपल्या दु :खाचे खापर प्राराब्धावर सोडतात .प्रारब्धामुळे असे भोगावे लागते असे मानतात .परन्तु समर्थ म्हणतात की ते तसे नसते .माणूस नीट प्रयत्न करत नाही .तो जे जे करतो त्याचे त्याला अपेक्षित फळ मिळत नाही .दोष आपल्या कड़े आहे ,आपला अवगुण त्याला कळत नाही .मग त्याचा मार्ग चुकतो आणि त्याला दैन्यवाणे जीवन जगावे लागते .समर्थ म्हणतात :
लोकांचे मनोगत कलेना । लोकांसारिखे वर्तावेना । मूर्खपणे लोकी नाना । कळह उठती । । १२-२-८
मग ते कळो वाढती । परस्परे कष्टी होती । प्रेत्न राहता अंती । श्रमची होये । । १२-२-९
लोकांच्या मनात काय आहे ,लोकांना काय आवडेल ते जेव्हा समजत नाही तेव्हा भांडणे होतात .भांडणे वाढत जातात .त्यामुळे त्याला व इतरांना दु :खी व्हावे लागते .योग्य प्रयत्न थांबतो .फक्त विनाकारण श्रम होतात ।
बोलतो खरे चालतो खरे । त्यास मानिती लहान थोरे । न्यायेअन्याये परस्परे । सहजची कळे । । १२-२-१५
लोकांस कळेना तंवरी ।विवेके क्षमा जो न करी । तेणेकरिता बरोबरी । होत जाते । । १२-२- १६
ज्यांचे बोलणे खरे व वागणे खरे ,त्याला लहान थोर मानतात .बरोबर काय ,चूक काय योग्य काय ,अयोग्य काय हे लोकांना कळत नाही ,तोपर्यंत अशा पुरुषाने विवेकाने क्षमा केली पाहिजे .समर्थ म्हणतात :
परिले ते उगवते । उसिणे द्यावे घ्यावे लागते। वर्म काढिता भंगते । परांतर । । १२-२-२१
लोकिकी बरेपण केले । तेणे सौख्य वाढिले ।उत्तरा सारिखे आले । प्रत्योत्तर । । १२-२--२२
हे आवघे आपणापासी । येथे बोल नाही जनासी । सिकवावे आपल्या मनासी । क्षणक्षणा । । १२-२-२३
आपण जे परतो तेच उगवत .आपण उसने घेतले तर ते फेडावे लागते .कोणाचे गुप्त रहस्य उघड केले तर त्याचे अंत :करण दुखावले जाते .आपण लोकांशी चांगले वागलो तर जीवनात सुख वाढते .उत्तरा सारखे उत्तर येते असा नियम आहे .जीवनात सुख भोगायाचे की दु :ख ते आपल्याच हाती आहे .दूसरा कोणी यासाठी दोषी नसतो .ही गोष्ट सतत मनाला पटवायला समर्थ सांगतात .त्यासाठी मरणाचे स्मरण ठेवून विवेक जागा ठेवावा असे समर्थ सांगतात ।
लोक नाना परीक्षा जाणती । अंतर परीक्षा नेणती । तेणे प्राणी करंटे होती । संदेह नाही । । १२-२-२५
आपणास आहे मरण । म्हणौनि राखावे बरेपण । कठीण आहे लक्षण । विवेकाचे । । १२-२ -२६
माणसांच्या बाह्य लक्षणांवरून आपण त्यांची परीक्षा करतो .पण त्यांच्या अंतरंगाची परीक्षा आपल्याला करता येत नाही .त्यामुळे ती माणसे भाग्यवान होत नाहीत .आपण एक दिवस मरणार आहोत हे लक्षात ठेवून लोकांशी प्रेमाने संबंध ठेवावेत .माणूस खुप शिकला ,पण प्रसंगाला अनुरूप वागला नाही तर त्याची विद्या वाया जाते .

No comments: