Tuesday, August 10, 2010

मूळमाया : एक चंचल नदी

श्री समर्थ द ,११ स ७ मध्ये मूळमायेला चंचल नदीचे रूपक देतात .मूळमाया चंचल आहे ,वासनामय आहे .ती वाहत्या नदीसारखी आहे .तिचे मूळ स्वरुप सूक्ष्म ,निर्मळ सर्वव्यापी ,ब्रम्हाइतके पवित्र असते .तिच्या स्मरणाने जग पवित्र होते .समर्थ म्हणतात :
चंचल नदी गुप्त गंगा । स्मरणे पावन करी जगा । प्रचित रोकड़ी पहागा । अन्यथा नव्हे । । ११ -७-१
केवळ अचंचळी निर्माण जाली । अधोमुखे बळे चालिली ।अखंड वाहे परी देखिली । नाहीच कोणी । । ११-७-२
समर्थ सूक्ष्मापासून स्थूलाकड़े जाणारी , ब्रह्मापासून दृश्य विश्वाकडे वाहणारी नदी म्हणतात .ती वाहती असली तरी अदुश्य आहे ,ती दिसत नाही .पण तिचा प्रभाव मात्र जाणवतो .नदी डोंगरात उगम पावून खाली वाहत येते ,त्याप्रमाणे मूळमाया रूपी नदी ब्रह्मरूपी पर्वतावर उगम पावून स्थूल दृश्य विश्वाकडे वाहत येते ।
नदी वाहत येत असताना ज्याप्रमाणे अडथळे पार करून जावे लागते ,त्याप्रमाणे मूळमाया रूपी नदी पार करत असताना अड़थळे पार करावे लागतात .समर्थ म्हणतात :
येक ते वाहतची गेले । येक वळशामध्ये पडिले । येक सांकडीत आडकले । अधोमुख । । ११-७-८
येक आपटोआपटोँच गेली । येक चिराडोचिरडोँचि मेली । कितीयेक ते फुगली । पाणी भरले । । ११-७-९
येक बळाचे निवडिले । ते पोहतची उगमास गेले । उगम दर्शने पवित्र झाले । तीर्थरूप । । ११-७-१०
बरेच जीव मायानदीच्या प्रवाहात वाहात जातात ,नाश पावतात .काहीजण सुखदु:खाच्या भोव -यात सापडतात .अधोगातीला जातात .म्हणजे नीच योनीत जातात ,जन्म मरणाच्या भोव-यात सापडतात .देह्बुध्दीनी स्वार्थी बनून बहिर्मुख होतात .काही जीव दृष्याच्या मागे लागतात .द्वैताने संघर्ष निर्माण होतो .संकटांची परंपरा निर्माण होते ,त्यामुळे ते दडपले जातात .अहंकाराने उन्मत्त होतात .वाया जातात ।
पण काही जीव बलवान असतात ,धारिष्टाचे असतात .प्रवाहाच्या उलट दिशेने पोहून मूळमायेच्या उगमापर्यंत पोहोचतात ,ब्रह्मस्वरूपा पर्यंत पोहोचतात .पवित्र होतात .ब्रह्मात विलीन होतात .समर्थ म्हणतात :
उगमापैलीकडे गेले । तेथे परतोनि पाहिले । तव ते पाणीच आटले । काही नाही । । ११-७-२१ वृत्ती शून्य योगेश्वर । याचा पाहावा विचार । दास म्हणे वारंवार । किती सांगो । । ११-७-२२ जाणते पुरुष जे मायेच्या उगमा पर्यंत पोहोचतात ,त्यांनी मागे वळून पाहिले तर माया नदीचे पाणी आटलेले असते .मायेने निर्माण झालेले दृश्य विश्व नाहीसे झालेले असते .कारण ते ब्रह्मस्वरूप झालेले असतात .माया तेथे नाही अशी अनुभूती त्यांना येते .अशी अनुभूती वृत्ती शून्य केलेल्या योगेश्वराला येते .











No comments: