Wednesday, August 4, 2010

परमात्मा

सकळ उपाधी वेगळा । तो परमात्मा निराळा जळी असोनि नातळे जळा । आकाश जैसे । । ६-५-२४
दृश्य विश्वाच्या सगळ्या बंधनाच्या पलिकडे निराळेपणाने परमात्मा असतो .आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते ,तसा परमात्मा सर्वत्र व्यापून असून अलिप्त असतो ,गुप्त असतो .समर्थ म्हणतात :
दिसेना जे गुप्त धन । तयासी करणे लागे अंजन । गुप्त परमात्मा सज्जन । संगती शोधावा । । ६-९-१९
म्हणुनी हे दृश्यजात । आवघेची आहे अशाश्वत । परमात्मा अच्युत अनंत । तो या दृश्या वेगळा । । ६-९-२२
दृश्या वेगळा दृश्या अंतरी । सर्वात्मा तो सचराचरी । विचार पाहता अंतरी । निश्चय बाणे । । ६-९-२३
जसे गुप्त धन नुसत्या डोळ्यानी दिसत नाही ,अंजन घालावे लागते ,त्याच प्रमाणे गुप्त असलेला परमात्मा चर्मदृष्टीला दिसत नाही .त्यासाठी ज्ञानदृष्टी लागते .ती संतांच्या जवळ असते .म्हणून सत्संगतीत राहून परमात्मा शोधावा लागतो .परमात्मा दृश्याहून वेगळा असतो पण दृष्याच्या अंतरी वास करतो .सगळ्या चराचरात भरून राहिलेला असल्यामुळे तो सर्वांचा आत्मा असतो .विचाराने कळते की तो सर्वान्तर्यामी असतो .तो मिळवण्यासाठी संसार सोडावा लागत नाही ,प्रपंच टाकावा लागत नाही .विचारांच्या सहाय्याने संसारात राहून आत्मज्ञान होते .जन्माचे सार्थक होते ।
जन्माचे सार्थक कसे होते ?
याची जन्मे येणेची काळे । संसारी होईजे निराळे । मोक्ष पाविजे निश्चळे । स्वरूपाकारे । । ६-९-२९
याच जन्मात याच जमान्यात मनाने संसारातून बाजूला साराव़े ,स्वरूपाशी एकाकार व्हावे .मोक्ष प्राप्त करून घ्यावा .सर्वत्र तोच भरला आहे असा अनुभव घेणे ,हीच परमात्म्याची उपासना !
असा हा परमात्मा आत्मनिवेदन भक्तीने प्राप्त होतो .परमात्म्याला शरण जावून त्याच्याशी अनन्य होणे हीच आत्मनिवेदन भक्ती !भक्त देवाशी अनन्य झाला की तो देवस्वरूपाच होतो ।
देवाच्या चरणी समर्पण कसे व्हायचे ?
त्यासाठी आधी मी कोण याचा शोध घ्यायचा ,नंतर निर्गुण परमात्मा कसा आहे ते जाणून घ्यायचे ,देव भक्त संबंध कसा असतो ते जाणून घ्यायचे ,म्हणजे देव भक्ताशी तद्रूप होतो .त्यांच्यातील वेगळेपण संपते .त्यांच्यात भेद उरत नाही .आत्मसमर्पण होते आणि अभेद भक्तीची अवस्था प्राप्त होते

No comments: