Wednesday, August 25, 2010

निस्पृह कसा असतो ?

समर्थांचा महंत हाच त्यांचा निस्पृह ! समर्थ म्हणतात :
तोचि अंतरात्मा महंत । तो का होइल संकोचित । प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी । । ११-१०-२
कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळी सर्व सत्ता । त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणू ११-१०-३
ऐसे महंते असावे ।सर्व सार शोधून घ्यावे । पाहों जाता न सांपडावे । येकायेकी । । ११-१०-४
महंताने अंतरात्म्याचे ज्ञान करून त्याच्याशी एकरूप ,विशाल व्हावे .कारण अंतरात्मा हा खरा महंत आहे .महान ,थोर ,विशाल आहे .सगळे जाणणारा ,योगी आहे .जगात खरा कर्ता व भोक्ता अंतरात्माच आहे .सर्व जगावर त्याची सत्ता चालते .महंताने अंतरात्म्यासारखे बनून जेव्हडे सार आहे तेव्हडेच घ्यावे ।
कोणी शोधायला आल्यास नये .महंताला समर्थ लोकसंग्रह करायला सांगतात तो ही गुप्तपणे !
किर्ती रूपे उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त । वेश पाहाता शाश्वत । येकही नाही । । ११-१०-५
प्रगट कीर्ती ते ढळेनाबहुत जनास कळेना । पाहो जाता आढळेना । काय कैसे । । ११-१०-६

वेषभूषण ते दूषण । कीर्ती भूषण ते भूषण । चाळणेविण येक क्षण । जाऊंच नेदी । । ११-१०-७
महंताची कीर्ती सगळीकड़े पसरलेली असते .पण तो एक वेष घालून फिरत नाही .लोकांना त्याची प्रत्यक्ष माहिती नसते .त्याला लोक शोधायला गेले तर तो सापडत नाही .तो सतत समाजामधील समस्यांवर चिंतन करत असतो .महंत लोकसंग्रह कसा करतात ते समर्थ सांगतात :
त्यागी वोळखिचे जन । सर्वकाळ नित्यनूतन । लोक शोधून पाहती मन । परि इच्छा दिसेना । । ११-१०-८
पुर्ते कोणाकडे पाहिना । पुर्ते कोणासी बोलेना । पुर्ते येके स्थली राहिना । उठोन जातो । । ११-१०-९
जाते स्थळ ते सांगेना । सांगितले तेथे तरी जायेना । आपुली स्थिती अनुमाना । येवोंच नेदी । । ११-१०-१०
खरा महंत ओळखिच्या लोकांकडे कामाचे बीज पेरतो .तेथून निघून जातो .लोक त्याची परीक्षा घेतात .त्याचे अंतरंग शोधतात .पण त्याच्या अन्तर्यामी कोणत्याही वासना त्यांना दिसत नाहीत .तो अघळपघळ बोलत नाही .एका ठिकाणी राहत नाही .आपल्या स्थितीची तो कोणालाही कल्पना येऊ देत नाही .त्यासाठी महंताने काय करावे ते समर्थ म्हणतात :
अखंड येकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा । काळ सार्थकची करावा । जनासाहित । । 11-10-17
उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास शिकवावे । उदंड समुदाये करावे । परी गुप्तरूपे । । ११-१० -१८
आधी कष्ट मग फळ । कष्टची नाही ते निर्फळ । साक्षेपेविण केवळ । वृथापृष्ठ । । ११-१०-२०
समर्थ म्हणतात महंताने अखंड एकांत सेवावा .अभ्यास करावा .उत्तम गुण घेऊन जनाला शिकवावे .आधी कष्ट करून मग त्याचे फळ मिळते म्हणून समर्थ महंताला अचूक कष्ट करण्याची शिकवण देतात .महंताने आपल्या सारखे महंत तयार करावे असे समर्थ सांगतात ।
महंते महंत करावे । युक्तीबुध्दीने भरावे । जाणते करून विखरावे । नाना देसी । । ११-१०-२५

No comments: