Tuesday, August 3, 2010

अंतरात्मा

मुमुक्षु साधकावस्थेत जातो तेव्हा तो अंतरात्म्याचे पूजन करायला लागतो .अंतरात्म्याचे पूजन साधक का करायला लागतो ते समर्थ सांगतात :
सकळ चाळीता येक । अंतरात्मा वर्तवी अनेक । मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेचि चालती । । १०-१०-३५ । ।
मुंगी सारख्या प्राण्यापासून ते ब्रह्मादिका पर्यंत सर्वांमध्ये अंतरात्मा असतो .तो अंतरात्मा आहे तरी कसा ते समर्थ सांगतात :
तो कळतो परि दिसेना । प्रचित येते परी भासेना । शरीरी असे परी वसेना ।येक़े ठाई । । १०-१०-३७
श्रोती बैसू न ऐकतो । घ्राणेंद्रिये वास घेतो । त्वचंद्रिये जाणतो । सीतोष्णादिक । । १०-१०-४१
तो चालवी सकळ देहासी । करून अकर्ता म्हणती त्यासी । तो क्षेत्रज्ञक्षेत्रवासी । देही कूटस्थ बोलिजे । ।
एकच अंतरात्मा सर्वांना चालवतो .सर्वांमध्ये हालचाल करवतो ,कार्य करवतो ,पण तो वेगळेपणाने भासत नाही .शरीरात तो राहतो ,पण एकाच ठिकाणी तो राहत नाही ,कधी तो आकाशभर पसरतो .तर कधी मोठ्या सरोवरात पसरतो .तो सर्वत्र पसरतो .दृष्टीने पहातो ,कानाने ऐकतो ,नाकाने वास घेतो ,जिभेने चाखतो, नाकाने वास घेतो ,त्वचेने थंडगरम ओळखतो,सर्वांमध्ये असून सर्वांपासून निराळा आहे .तो सर्व देहांना चालवतो पण सर्व देहांपासून निराळा आहे
सूक्ष्मरूपे स्थूल रक्षी । नाना सुखदुखे परीक्षी । त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा । । ११-४-१५
प्राण्यांचे देह वेगळे असले तरी सर्वांचे अंत :करण एकच असते .त्या सगळयांना वागवणारी जीवनकला एकच असते .तिलाच जगज्जोती म्हणतात .ती कर्मेंद्रियाद्वारे अनेक प्रकाराची सुखदुखे घेते .ती स्वत :सूक्ष्मरूपे आहे पण स्थूल देहाचे रक्षण करते .अन्तर्यामी राहणा-या सूक्ष्म जाणीव कलेलाच अंतरात्मा म्हणतात .अंतरात्मा सर्व दृष्याचे व कर्माचे मूळ आहे .प्रकृतीने अस्तित्वात येणा-या अंतरात्म्याला ओळखले की प्रकृतीचा पालटतो .असा मनुष्य व्यवहार करत राहिला तरी त्याचे अनुसंधान सुटत नाही .त्याचा अंतरात्मा जागा होतो .अंतरात्म्याची उपासना विश्वव्यापी बनते.तीच उपासकाला परब्रह्मात विलीन करते .म्हणून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य व्हावे .त्या अंतरात्मारूपी नारायणाला अखंड ध्यानी मनी आठवावे .अंतरात्मा विश्वात व्यापून आहे .त्याची पूजा करत जावी .त्यासाठी कोणीतरी जीव संतुष्ट करावा .देहासाठी केलेले अंतरात्मा ग्रहण करतो .त्याच्या पर्यंत ते पोहोचते .म्हणून कोणत्याही देहाची मनापासून सेवा करावी ।
जे जे भेटेल भूत । ते ते मानिजे भगवंत । असा दृष्टीकोन ठेवून भेटेल त्याला आपला समजून गरजू माणसाला मदत करावी .ती अंतरात्म्याची उपासनाच असते ,अशी उपासना करता करता निरंजना पर्यंत पोहोचता येते .त्यावेळेस साधक सिध्द अवस्थेला पोहोचतो .आणि परमात्म्याची ज्ञानोत्तर भक्ती करू लागतो .

No comments: