Saturday, September 12, 2009

माया ब्रह्म ते कैसे ?

माया ब्रह्म
श्रोते पुसती ऐसे । माया ब्रह्म ते कैसे । श्रोत्यां वक्तयां मिसे । निरूपण ऐका। । ६ -५ -१ । ।
श्रोत्यांनी माया आणि ब्रह्म कसे असते ते सांगा म्हटल्यावर समर्थ माया आणि ब्रह्मातला फरक सांगतात :
ब्रह्म निर्गुण निराकार आणि माया सगुण साकार
ब्रह्म निरोपाधी केवळ -उपाधी नसलेले आणि माया उपाधिरूपी
ब्रह्म दिसेना आणि माया दिसे
ब्रह्म भासेना आणि माया भासे
ब्रह्म नासेना कल्पांतकाळी आणि माया नासे
ब्रह्म रचेना अणि माया रचे
ब्रह्म खचेना आणि माया खचे
ब्रह्म रूचेना अज्ञानासी आणि माया रुचे
ब्रह्म उपजेना आणि माया उपजे
ब्रह्म मरेना आणि माया मरे
ब्रह्म धरेना धारणेसी आणि माया धरे
ब्रह्म फुटेना आणि माया फूटे
ब्रह्म तुटेना आणि माया तुटे
ब्रह्म विटेना -अविनाशी असल्याने आणि माया विटे -विनाशी असल्याने
ब्रह्म निर्विकारी आणि माया विकारी -बदल घडणारी
ब्रह्म काहीच न करी आणि माया सर्व करी
ब्रह्म ते अरूप आणि माया नाना रूपे धरी
ब्रह्म ते शाश्वत ते एक -ते कायम टिकणारे आणि माया पंचभूतिक अनेक -दृश्य विश्व हा मायेचाच पसारा
ब्रह्म थोर आणि माया लहान
ब्रह्म सार आणि माया असार
ब्रह्म आकाशा ऐसे निवळ -निरभ्र ,स्वच्छ आणि माया वसुंधरा डहूळ -पृथ्वी सारखी मलिन आणि गढूळ
ब्रह्म सूक्ष्म केवळ आणि माया स्थूल रूपी
ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे आणि माया प्रत्यक्ष दिसते
ब्रह्म ते समचि असे -सर्वत्र सारखे आणि माया ते विषम रूपी -अधिक उणी म्हणजे कोठे कमी कोठे जास्त
ब्रह्म अलक्ष -म्हणजे ध्यानाचा विषय नाही आणि माया लक्ष-ध्यानाचा विषय होतो
ब्रह्म असाक्ष -तर्काच्या पलिकडे आणि माया साक्ष- मायेचा तर्क करता येतो
ब्रह्म अखंड घनदाट आणि माया पंचभूतिक पोचट
ब्रह्म निरंतर निघोट -कायमचे ,पूर्णरूप आणि माया ते जुनी ,जर्जरी -जुनी कुजकी नाशवंत
ब्रह्मासी नाही करणे हेत -ब्रह्म कर्मरहित आणि हेतूरहित आणि मायेसी आहे -माया कर्ममय व हेतूयुक्त
ब्रह्म घडेना आणि माया घडे
ब्रह्म पडेना आणि माया पडे
ब्रह्म असतचि असे आणि माया निरसिताची निरसे
ब्रह्मांस कल्पांत नसे आणि मायेला कल्पांत आहे
ब्रह्म कोमल आणि माया कठिण
ब्रह्म विशाळ आणि माया अल्प
ब्रह्म असे सर्वकाल आणि माया नासे
वस्तू नव्हे बोलिजे ऐसी -वस्तू म्हणजे ब्रह्म त्याचे वर्णन करता येत नाही आणि माया जैसी बोलिजे तैसी
काळ पावेना वस्तूसी -मृत्यु ब्रह्माचा नाश करत नाही आणि मायेसी झडपी-दृश्यातील सर्व वस्तूंचा नाश काळ करतो
ब्रह्म अभंग । जैसे तैसे । आणि माया भंगे
विश्वात जेव्हडे सचेतन व अचेतन दिसते व बदलत जाऊन नाश पावते ती माया .परब्रह्म चाराचराला ,सबंध विश्वाला व्यापून आहे .दृश्य विश्वाच्या पलिकडे ,परमात्मा असतो .तो निराळेपणाने राहतो .आकाशाचे प्रतिबिंब जसे पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते तसा परमात्मा सर्वत्र व्यापलेला असून अलिप्त असतो .



Monday, September 7, 2009

परब्रह्म कसे अनुभवावे ?


ब्रह्मानुभव कसा घेता येतो ?
माया विवेके मावळे । सारासार विचार कळे । परब्रह्म तेही निवळे । अंतर्यामी । । १ -९ -१४ । ।
ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड । पंचभूतांचे थोतांड । तुच्छ्य वाटे । । १ -९ -१५ । ।
प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका । शुध्द आत्मा विवेका । अंतरी जाणा। । १ -९ -१६ । ।
परमार्थाचे महात्म वर्णन करताना समर्थ सांगतात की परमार्था मुळे सायोज्य मुक्ती मिळते आणि ब्रह्मानुभव
येतो .आत्मानात्म विवेकाने माया नाहीशी होते .सार काय असार काय ते कळते.ह्रुदयात ब्रह्मस्वरूप स्वच्छपणे अनुभवास येते .अनंतपणे ब्रह्म जिकडे तिकडे अनंतपणे अनुभवास येते .प्रपंच खोटा वाटतो .मायेचा पसारा कल्पनामय वाटतो .विवेकाने शुध्द आत्म्स्वरूपाचे दर्शन होते .आत बाहेर ब्रह्मदर्शनाची अवस्था स्थिर होते .मग सर्व संशय नाहिसे होतात .हे दृश्य विश्व जून ,फाटके,जर्जर -भोके पडलेले ,कुहिट -कुजट वाटू लागते .
दशक ६ समास २ मध्ये समर्थ म्हणतात :
प्रगट ते जाणावे असार । आणि गुप्त ते जाणावे सार । गुरुमुखे हा विचार । उमजो लागे । । ६ -२ -२१ । ।
जे उमजेना ते उमजावे । जे दिसेना ते पहावे । जे कळेना ते कळावे। विवेकबळे। । ६ -२ -२२ । ।
गुप्त तेचि प्रगटावे। असाध्य ते साधावे । कानडेचि अभ्यासावे । सावकास। । ६ -२ -२३ । ।
जे इंद्रियांना दिसणारे व उघड असते ते असार ,मिथ्या असते . जे गुप्त ,सूक्ष्म असते ते सार असते .गुरुकडून ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन कळू लागते .साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे व अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी
येते .त्यासाठी देहाचे नाही तर मनाचे कष्ट घ्यावे लागतात .अध्यात्मश्रवण हा त्यासाठी हमखास उपाय आहे .
दशक ६ समास ३ मध्ये समर्थ विवेकाने देहाकडे पहायला सांगतात .
तत्वे तत्व मेळविले। त्यासी देह हे नाम ठेविले । ते जाणते पुरुषे शोधिले । तत्वे तत्व । । ६ -३ -२० । ।
तत्वझाडा निशेष होतां । तेथे निमाली देहअहंता । निर्गुण ब्रह्मी ऐक्यता । विवेके झाली । । ६ -३ -२१ । ।
चार देह ,चार अवस्था ,चार अभिमान ,चार स्थाने ,चार भोग ,चार शक्ती अशी ३२ तत्वे ,स्थूल देहाची २५ ,सूक्ष्म देहाची २५ तत्वे अशी एकूण ८२ तत्वे मिळून देह बनतो .या ८२ तत्वांचा निरास केला म्हणजे प्रत्येक तत्व म्हणजे मी नाही असे दाखवल की 'देह म्हणजे मी नाही ' असा प्रत्यक्ष अनुभव येतो .आपला आपण शोध घेतला की आपण भ्रमात्मक आहोत किंवा मिथ्या आहोत हे कळते .शेवटी शुध्द व खरे निर्गुण ब्रह्म तेव्हडे उरते .ही तत्वे विरली की मी -तू पणाचा भ्रम्ही विरतो .तेव्हा जो शुध्द मी उरतो तेच निर्गुण आत्मस्वरूप !
ब्रह्मी शब्दी ऐसे तैसे । बोलिजे त्याहून अनारिसे । परी ते श्रवण अभ्यासे । पाविजे ब्रह्म । । ७ -२ -७ । ।
ब्रह्माचे वर्णन ब्रह्म असे आहे , तसे आहे असे कितीही वर्णन केले तरी ते त्या वर्णनाहून निराळे असते .श्रवण करून साधानाभ्यास करणे हा एकच उपाय ब्रह्मदर्शन करून देतो आणि त्यासाठी
सद्गुरुकृपा तेचि किली । जेणे बुध्दी प्रकाशली । द्वैतकपाटे उघडली । येकासरी। । ७ -२ -१५ । ।
सद्गुरु कृपा हीच किल्ली आहे ज्यामुळे बुध्दीत आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो .सद्गुरुकृपेने देह्बुध्दी जाऊन आत्मबुध्दी प्रगट होते .आत्मबुध्दीत सुखाला कमतरता नसते .तेथे मनाचा शिरकाव होत नाही .पण मानावाचून साधना चालू रहाते.मनाचा लय होतो .मनाचे संकल्प विकल्प मावळतात.इच्छा ,आकांक्षा नाहिशा होतात .मी साधना करतो हा अहंभावही नाहीसा होतो .
ते पराहूनि पर । मनबुध्दी अगोचर । संग सोडिता सत्वर । पाविजेते । । ७ -२ -१८ । ।
माणसाने देहाचा संबंध सोडला तर ब्रह्म ताबडतोब प्राप्त होते .देहाचा संग सोडायचा म्हणजे मी पणाचा त्याग करायचा .मी पण म्हणजे जीव पण .मी जीव आहे ,अज्ञानी आहे देहापुरता मर्यादित आहे असे समजणे म्हणजे देह्बुध्दी .देहाबुध्दीला बाजूला सारणे म्हणजे संग सोडणे.संग सोडला म्हणजे ब्रह्म स्वरूपाशी ऐक्य घडून
येते .स्वस्वरूपाशी अनन्य होणे.ते कसे व्हायचे ते समर्थ द.९ स .२ मध्ये सांगतात :
करावे तत्व विवरण । शोधावे ब्रह्म निर्गुण । पाहावे आपणासी आपण । म्हणजे कळे। । ९ -२ -३३ । ।
या दृश्य विश्वातील तत्व विवरण केले ,निर्गुण ब्रह्माचा शोध घेतला ,आपण कोण हे नीट पाहिले की स्वरुप कसे आहे ते कळू लागते .मग स्वस्वरूपाविषयी बोलणे थांबवून त्याचे अखंड मनन चिंतन करत राहून त्यामध्ये लीन होता येते .त्यासाठी समर्थ वृती विशाल करायला सांगतात .वृती जेव्हडी विशाल करू तेव्हडी मती विशाल होते ,तेव्हडे ज्ञान व अनुभव विशाल होतात .विश्व दिसायला शिल्लक उरत नाही. साधक अखंड व निरंतर चिंतनाने अंतरात्म्याशी अनन्य होतो ,त्याचा मी पणा नाहीसा होतो व आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो .

परब्रह्माची लक्षणे

दशक ९ समास१ मध्ये समर्थांनी सांगितलेली ४२ लक्षणे
परब्रह्माची ४२ लक्षणे
१निराकार -आकार नसलेले , निराधार -आधार नसलेले , निर्विकल्प -कल्पना नसलेले
२ निरामय -आमय म्हणजे रोग ,नाश ,विकार .नाश व विकार नसलेले , निराभास -भास नसलेले ,
३ निरावेव -अवयव नसलेले , नि :प्रपंच -प्रपंच नसलेले नि :कलंक -कलंक नसलेले
४ निरोपाधी -उपाधी नसलेले , निरोपम्य -उपमा नसलेले निरालंब -कशावरही अवलंबून नसलेले
५ निरापेक्षा-अपेक्षा नसलेले , निरंजन -प्राणीमात्रांचा संसर्ग नसलेले
निरंतर -अवकाश व मोकळी जागा नसलेले
६ निर्गुण -गुण नसलेले नि :संग -आसक्ती नसलेले निर्मळ-मळ नसलेले
७ निश्चळ- स्वस्थिती पासून चळण नसलेले , नि :शब्द -शब्द किंवा भाषा नसलेले
८ निर्दोष -दोष नसलेले निवृती -कोणतीही वृती नसलेले नि :काम -कोणतीही इच्छा नसलेले
९ निर्लेप -कशालाही न चिकटलेले नि :कर्म -कोणतेही कर्म नसलेले नि :कर्म -कोणतेही कर्म नसलेले
अनाम्य -नाम नसलेले कारण त्याला जन्म ,रूप नाही ते इंद्रिय गोचर नाही ।
१० अगणित -परब्रह्माचे मोजमाप करता येत नाही । अकर्तव्य -नीती अनितीच्या पलिकडे
११ अक्षै- झीज नाही अरूप -रूप नाही अलक्ष - मनाला आकलन होत नाही
१२ अनंत -ज्याला अंत नाही अपार -अमर्याद अढळ- स्थानाहून ढळत नाही
१३ अनंत -ज्याला अंत नाही अतर्क्य -बुध्दीला त्याच्या स्वरूपाची कल्पना अद्वैत -परब्रह्म एकच आहे हे पटणे
१४ अदृश्य -इंद्रिय गोचर नाही अच्युत - त्याच्या स्थानावरून घसरत नाही अछेद -तोड़ता येत नाही
१५ अदाह्य -जळत नाही अक्लेद -पाण्याने भिजत नाही .





Saturday, September 5, 2009

ब्रह्माचे स्वरुप

ब्रह्म
श्री समर्थ रामदासांनी ब्रह्माचे स्वरूप दासबोधात अनेक समासांतून विस्तृत पणे सांगितले आहे .ब्रह्मालाच परमात्मस्वरूप असेही म्हणतात .समर्थ परब्रह्माचे वर्णन करताना परमात्मवस्तू दुर्लभ आहे असे
म्हणतात .परमात्मवस्तू मिळणे म्हणजे अलभ्य लाभ आहे असे म्हणतात .ती केवळ संतसंगतीने मिळते .ती अगदी उघड आहे ,म्हणजे सर्व व्यापी आहे पण देहबुध्दीने तिला पाहता येत नाही .ती दिव्याच्या किंवा कोणत्याही प्रकाशाने दिसत नाही .पौर्णिमेचा चंद्रप्रकाश तिला दाखवू शकत नाही .तेजोमय सूर्य तिला दाखवू शकत नाही .कारण परमात्म वस्तू वाणी ,मन ,बुध्दी च्या पलिकडे आहे .तिचे स्वरूपच असे आहे की हजार तोंडाचा शेष ही परमात्मवस्तूचे वर्णन करू शकत नाही .मायेच्या अंगी असणा-या कला व शक्तीही परमात्मवस्तूची ओळख करून देवू शकत नाही .
परब्रह्म ते हालवेना। अथवा ठावही चुकेना । काळांतरी चळेना । जेथीचा तेथ। । १ -९ -८ । ।
परब्रह्म जागेवरून उचलता येत नाही .स्थानावरुन ढळत नाही .ते जसेच्या जसे स्थीर रहाते.त्याच्यात कधी पालट होत नाही .कितीही काळ गेला तरी कमीजास्त पणा होत नाही .ते झिजत नाही .पण सद्गुरू च्या ज्ञान रूपी अंजनानेच ते दिसते .
आदि अंत ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची खूण। । ६ -२ -८ । ।
विश्व निर्माण होण्याआधी व निर्वाण पावल्या नंतर गुणातीत ब्रह्म जसेच्या तसे राहते .तीच त्याची शाश्वतपणाची खूण आहे .विश्व आले आणि गेले तरी ज्यात यत्किंचितही फरक पडत नाही तीच सदवस्तू ! परब्रह्म इतका थोर आहे की ब्रह्मादिकांना ही तो कळत नाही .
जे शस्त्रे तोडिता तुटेना । जे पावके जाळिता जळेना। कालविता कालवेना। आपेकरूनि। । ६ -२ -१६ । ।
ब्रह्म शस्त्राने तोडू म्हटले तर तुटत नाही .विस्तवाने जळत नाही ,पाण्यात कालवले जात नाही .वा -याने उडत
नाही ,पडत नाही ,झडत नाही ,घडवता येत नाही ,त्याला रंग नाही .ते सदा सर्व काळ टिकते ,निरंतर टिकते .ते दिसत नसले तरी सगळीकडे भरून आहे .सूक्ष्मपणे सर्वत्र व्यापून आहे .
जे सन्मुखचि सर्वकाळ। जे नि :कळंक आणि निखळ। सर्वांतर आकाशपाताळ। व्यापूनि असे । । ६ -३ -५ । ।
जे अखंड आहे ,अति विशाल आहे ,इंद्रियांना जे दिसत नाही ,मनाला भासत नाही ,ते उत्पन्न होत नाही ,नाश पावत नाही ,त्यात बदल होत नाही ,त्यात विभाग नाहीत ,त्यामुळे त्याची रचना करता येत नाही ,.ते सदा सर्वकाळ समोर असते ,आकाश पाताळ व्यापून असते त्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी असते .
ब्रह्म प्रळयावेगळे। ब्रह्म नावारूपा निराळे। ब्रह्म कोणी येक्या काळे। जैसे तैसे । । ६ -४ -२३ । ।
परब्रह्माला प्रळय स्पर्श करू शकत नाही .ते नामारूपा च्या पलिकडे आहे .कोणत्याही काळी ब्रह्म जसेच्या तसे आहे त्यात पालट घडत नाही .
ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म नि :संग निर्विकार । ब्रह्मासि नाही पारावार । बोलती साधू । । ७ -२ -१ । ।
ब्रह्म गुणरहित ,आकार रहित ,संगरहित ,विकार रहित ,मर्यादा रहित ,आहे .सर्वव्यापक ,अनेकात एकपणाने
आहे ,शाश्वत अंत नसणारे ,सदा सर्वकाळ स्थिर असणारे आहे .ते कल्पने पलिकडे आहे ,दृश्याहून वेगळे
आहे .अतींद्रिय आहे ,सर्व इंद्रियांनी मिळून जाणण्याचा प्रयत्न केला तरी न कळणारे आहे .
ते परेहून पर । मनोबुध्दी अगोचर । संग सोडिता सत्वर । पाविजेते । । ७ -२ -१८ । ।
ब्रह्म देहाच्या अनुभवा पलिकडे आहे .त्या मुळे ते मन बुध्दी च्या पलिकडे आहे ब्रह्म नवे नाही ,जुने नाही ,नवे जुने हा
कालभेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही .जेथे विश्रांतीला विसावा मिळतो असा आदि पुरूष आत्माराम आहे .
ब्रह्म आकाशाहून मलरहित आहे ,आकाशा सारखे पोकळ,अवकाशमय,रूप नसलेले व अति विशाल आहे .एकवीस स्वर्ग व सप्त पाताळांचा मिळून एक ब्रह्मगोल होतो .अशा अनंत ब्रह्मगोलाला ब्रह्माने व्यापले आहे .अनंत ब्रह्मांडाच्या वर व खाली सर्वत्र ब्रह्म पसरलेले आहे ते जळी स्थळी काष्ठी ,पाषाणी सर्वत्र ब्रह्म आहे .
परब्रह्माला परमात्मा हां शब्द समर्थ द.८ स .८ मध्ये वापरतात .
जन्म नाही मृत्यु नाही । येणे नाही जाणे नाही ।
बध्द मोक्ष दोनी नाही । तया परमात्मयासी । । ८ -८ -२ । ।
परब्रह्माला जन्म मृत्यु नाही बध्दता ,मोक्ष नाही .तो निर्गुण निराकार ,अनंत ,अपार ,नित्य ,निरंतर आहे .
द .९ स २ मध्ये समर्थ ब्रह्माला स्वस्वरूप म्हणतात .त्यासाठी आकाशाचा दृष्टांत देतात .जेव्हा आपण आकाश पाहतो त्यावेळेस आपल्याला आकाश दिसले असा भास होतो ,आकाश आपल्याला वेगळेपणाने दिसत नाही .तसे स्वस्वरूप सर्व वस्तूंना आतून बाहेरून व्याप्त असते .ते पाण्यात व्यापलेले असते पण भिजत नाही ,पृथ्वीमध्ये व्यापलेले असते पण झिजत नाही ,अग्नीत व्यापलेले असते पण जळत नाही चिखलात व्यापून आहे पण बुडत नाही वा -यात व्यापून असते पण उडत नाही .असे हे स्वरुप घनदाट पणे भरलेले असते पण त्याचा अनुभव घेता येत नाही कारण असते आपली अहंता ! आकाश आणि परब्रह्म यांची तुलना नेहमी केली जाते .पण आकाश म्हणजे परब्रह्म नाही कारण आपण आकाशाला वेगळे पणाने पाहू शकतो .,त्याची आपण कल्पना करू शकतो .पण ब्रहम निर्विकल्प व निर्विकार आहे .
ब्रह्म निर्मळ निश्चळ। शाश्वत सार अमळ विमळ । आकाश घन पोकळ। गगना ऐसे । । १२ -६ -१ । ।