Thursday, February 19, 2009

वंदन भक्ती

वंदन भक्ती
वंदन म्हणजे नमस्कार करणे,लीन होणे ,शरण जाणे ! देहाचा अभिमान जावा म्हणून वंदन भक्ती !वंदन भक्तीत नम्रता
येते .आपल्या भोवती वावरणा-या सर्व जीवांमध्ये ,अंतर्यामी वास करणारा भगवंत पाहता येतो .नमस्कार करताना हे वंदन त्याच्या बाह्यांगाला नसून अंतरंगातील अनंताला आहे .हे भान जेव्हा येते तेव्हा वंदन भक्ती साधते .तेव्हा देहाभिमान गलित होतो .
वंदन कोणाला करावे ?
सहावी भक्ती ते वंदन । करावे देवासी नमन । संत साधू आणि सज्जन । नमस्कारीत जावे । । ४ -६ -२ । ।
सूर्यासि करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार । सद्गुरुसि करावे नमस्कार । साष्टांगभावे । । ४ -६ -३ । ।
साष्टांग नमस्कारास अधिकारू । नाना प्रतिमा देवगुरु । अन्यत्र नमनाचा विचारू । अधिकारे करावा । । ४ -६ -४ । ।
भक्त ज्ञानी वीतरागी । महानुभाव तापसी योगी । सत्पात्रे देखोनी वेगी । नमस्कार घालावे । । ४ -६ -७ । ।
नमस्काराने काय लाभ होतो ?
नमस्कारे लीनता घडे । नमस्कारे विकल्प मोडे । नमस्कारे सख्य घडे । नाना सत्पात्रासी । । ४ -६ - १४ । ।
नमस्कारे दोष जाती । नमस्कारे अन्याय क्ष्मती। नमस्कारे मोडली जडती। समाधाने। । ४ -६ -१५ । ।
नमस्कारे कृपा उचंबळे। नमस्कारे प्रसन्नता प्रबळे। नमस्कारे गुरुदेव वोळे। साधकांवरी। । ४ -६ -१६ । ।
निशेष करिता नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर । आणि मुख्य परमेश्वर । कृपा करी । । ४ -६ -१८ । ।
नमस्कारे पतित पावन । नमस्कारे संतासी शरण । नमस्कारे जन्ममरण । दूरी दुरावे । । ४ -६ -१९ । ।
नमस्कार मोठे साधन का ?
नमस्कारास वेचावे न लगे । नमस्कारास कष्टावे न लगे । नमस्कारास काहीच न लगे । उपकर्ण सामुग्री।।४-६-२२
नमस्कारा ऐसे नाही सोपे । नमस्कार करावा अनन्य रूपे । नाना साधनी आक्षेपे। कासया सिणावे। । ४ -६- २३ । ।
साधक भावे नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली । सुगम पंथे नेउन घाली । जेथील तेथे । । ४ -६ -२४ ।
साधूला साधकाने नमस्कार करताना साधकाच्या डोळ्यातील भाव स्पष्ट दिसतो .साधक पूर्ण भावाने सद्गुरूंना शरण जातो तेव्हा त्याच्यावर सद्गुरूंना कृपा करावीच लागते ।
समर्थ अभंगात म्हणतात :
प्रेमाचिया सान्निधाने । देव आले साभिमाने । आता आनंद आनंद । देव भक्ता नाही भेद ।
मुख्य पूजा परंपरा । केला दासासि अधिकारा । दास पाऊल वंदितो । पदासन्निध रहातो । ।

Sunday, February 8, 2009

श्रीराम जयराम जय जय राम

। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
चप्पल चावल्यास पिओनिया ३० या होमिओपथी औषधाचा सुंदर उपयोग होतो .सकाळ व संध्याकाळी एक डोस घेतला की ताबडतोब बरे वाटते ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।

अर्चन भक्ती


अर्चन भक्ती
पाचवी भक्ती ते आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन । शास्त्रोक्त पूजाविधान । केले पाहिजे । । ४ -५ -२ । ।
आपल्या उपास्यदेवतेची पूजा करणे याला अर्चन म्हणतात .ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याचा आपण सत्कार करतो ,पूजा करतो हेच अर्चन भक्ती चे मूळ आहे .जे जे काही उत्तम ,सुंदर ,पवित्र आहे ते ते भगवंताला अर्पण करणे हे अर्चन भक्तीचे प्रधान लक्षण आहे .
अर्चनाचे दोन प्रकार असतात .१ स्थूल २ सूक्ष्म
स्थूल अर्चनात उपास्य देवता निश्चित केली जाते .सद्गुरू सुध्दा उपास्यदेवता होऊ शकते .देवतेची मूर्ती किंवा तसबीर असावी. तिला रोज स्नान घालावे ,उत्तम वस्त्र ,चंदन ,सुगंधी द्रव्ये ,फुले वहावी ,तिला सुग्रास नैवेद्य दाखवून आरती करावी मनापासून साष्टांग नमस्कार करून प्रेमदृष्टीने तिच्याकडे पहावे .
सूक्ष्म अर्चनात समर्थ मानसपूजा करायला सांगतात .यात आपली उपास्यदेवता किंवा सद्गुरू आपल्या ह्रुदयात आहे अशी कल्पना करावी. ती मूर्ती सजीव कल्पून स्थूल मूर्तीला किंवा तसबिरीला जे जे उपचार करतो ते ते करावे. पूजा आटोपली की देवतेला ह्रुदयात विश्रांती द्यावी .अशा रितीने भगवंताला रोज रंगवण्याचा अभ्यास केला की मन सूक्ष्म होते .मन अमूर्तात रंगू लगते ।
देव ,ब्राह्मण ,अग्नि ,साधू ,संत ,अतिथि यति,संन्यासी ,आत्मज्ञानी ,महात्मा ,गाय ,देवांच्या मूर्ती या सगळ्याची पुजा करावी .पूजा षोडोषपचार करावी .
समर्थ पुढे म्हणतात ,
याहिवेगळे कुलधर्म । सोडू नये अनुक्रम । उत्तम अथवा मध्यम । करीत जावे । ४ -५ - १५ । ।
याशिवाय गणपती ,देवीचे नवरात्र ,बोडण,यासारखे कुलधर्म आचरीत जावे असे समर्थ सांगतात ।
अर्चन भक्तीचा समारोप करताना समर्थ म्हणतात ,
काया वाचा आणि मने । चित्ते ,वित्ते ,जीवे प्राणे। सद्भावे भगवंत आर्चने। या नाव अर्चन भक्ती । ।
व्यवहारात सत्य ,न्याय ,सद्धर्म .अहिंसा ,प्रेम अपरिग्रहः [संग्रह न करणे] या सद्गुणांचे उपयोजन करणे ही च खरी देवपूजा

Friday, February 6, 2009

पादसेवन भक्ती

पादसेवन भक्ती
पादसेवन तेचि जाणावे । काया वाचा मनोभावे । सद्गुरूचे पाय सेवावे । सद्गतिकारणे। । ४ -५- २ । ।
पादसेवन कायेने करायचे म्हणजे शरीराने सद्गुरूची सेवा करायची ,वाचेने सद्गुरूने दिलेला मंत्र जपायचा ,मनाने सद्गुरूने केलेल्या उपदेशाचे चिंतन करायचे ,तो उपदेश आचरणात आणायचा .सद्गुरुची सेवा म्हणजे त्याने दाखवलेल्या मार्गाने जावून आपले जीवन भगवद कृपेला पात्र करणे.कारण सद्गुरूच परमात्म वस्तू दाखवतो आत्मसाक्षात्कार करून देतो .आत्मज्ञान अतिशय गुह्य आहे ,गुप्त आहे ,ते इंद्रियांना समजत नाही .त्यासाठी गुरूंना शरण जावून सात गोष्टी करायला समर्थ सांगतात ,
संगत्याग आणि निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण। सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तही एकरूप।।४-४-८। ।
संगत्याग म्हणजे देह्बुध्दीला बाजूला सारणे,मी देह आहे ,मी सर्व करतो ,ही भावना संपवणे,देह प्रपंच, मुले पत्नी धन ,हे सगळ माझ आहे ही भावना मनातून संपवून टाकायची .मीपणाचा त्याग करायचा .
निवेदन माणूस अंहकार रूपी मन ,बुध्दी ,इंद्रिय यांचे गाठोडे आहे .तो मी भगवंताच्या चरणी नाहीसा करणे म्हणजे निवेदन .भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे समजणे,मी भगवन्तापेक्षा वेगळा आहे असे न समजणे म्हणजे निवेदन ।
विदेहस्थिती वि म्हणजे अभाव ,मी देह आहे या अवस्थेचा अभाव म्हणजे विदेहस्थिती .देहात राहून देह नसल्या सारखी वृत्ती ठेवणे ,पुष्कळ कर्म करून काहीच न केल्यासारखी अवस्था सांभाळणे म्हणजे विदेहस्थिती .अशा अवस्थेत मी देह नाही ,ब्रह्म स्वरुप आहे असा प्रत्यक्ष अनुभव असतो .ब्रह्म स्वरुप झाल्याने तो पूर्ण संदेह रहित असतो .त्याला ना साधनाचे भान असते ना देहाचे .
अलिप्तपण विवेके अंतरी सुटला।वैराग्ये प्रपंच तुटला। अंतर बाह्य मोकळा झाला । नि :संग योगी । ।१२ -४ -१२।। विवेकाने तो सुटला असतो म्हणजे त्याला त्याचे खरे स्वरुप कळालेले असते ,मी कोण हे समजलेले असते,
त्यामुळे तो देहबुध्दीने लिप्त नसतो .बोले तैसा चाले असे त्याचे वागणे असते.
सहजस्थिती ऐक्यरूपे अभिन्न । सहजस्थिती । । आपण आणि आत्मा अभिन्न आहोत या अनुभवाने सहजस्थिती प्राप्त होते .या अवस्थेत देहाचे सर्व व्यवहार होतात पण स्वरूपाशी झालेले ऐक्य तसेच्या तसेच रहाते.सदा सर्व काळ ब्रह्म भावात असणे म्हणजे सहजस्थिती .
उन्मनी मी पण नाहीसे होते ,आत्मानात्म विवेकाने परब्रह्माशी असलेल वेगळेपण नाहीसे होते .वृती विरहित अवस्था येऊन उन्मनी अवस्था येते .
विज्ञान जेथे अज्ञान सरे । ज्ञान तेही नुरे । विज्ञान वृत्ति मुरे । परब्रह्मी । । ७ -५ -५१ । ।
वस्तूचे यथार्थ स्वरुप न कळणे म्हणजे अज्ञान .वस्तूचे यथार्थ स्वरुप कळणे म्हणजे ज्ञान .ज्ञान रूपी जाणीव सुध्दा मागे राहते त्यावेळेस स्वरुप साक्षात्कार होतो .मी आत्माच आहे असा अनुभव येतो त्याला विज्ञान म्हणतात .
देव ब्राह्मण ब्रह्मज्ञानी संत ,सात्विक सज्जन या सेवेला योग्य आहेत ।
पादसेवन चौथी भक्ती । पावन करीतसे त्रिजगती ।
जयेकरिता सायोज्य मुक्ती । साधाकास होये। । ४ -४ -२५ । ।

Thursday, February 5, 2009

नाम स्मरण भक्ती

नाम स्मरण भक्ती
नाम म्हणजे खूण,संकेत ! राम म्हणजे आत्मशक्ती,चेतना ! तिचा बोध ज्यामुळे होतो त्याची खूण म्हणजे
रामनाम !
प्रा.के .वि .बेलसरे म्हणतात ,'नाम म्हणजे दृष्याला द्रुश्यपणे धारण करणारी परमात्मशक्ती! म्हणून नाम हे मूर्त व
अमूर्त ह्यांना जोडणारी साखळी आहे .नामस्मरण म्हणजे आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे व त्याच्या सत्तेने
सगळे घडते आहे ही जाणीव जागी राहणे।' समर्थ म्हणतात -
स्मरण देवाचे करावे । अखंड नाम जपत जावे । नामस्मरणे पावावे । समाधान । । ४ -३ -२ । ।
गोंदवलेकर महाराज म्हणतात ,'नाम कुठवर घ्यावे ?अक्षरश: जीव जाईपर्यंत ,मी पणाने मरेपर्यंत नाम घेत
सुटावे .शेवटी मी जातो नाम शिल्लक राहते ।
नाम का घ्यायचे ?
नाम घ्यायचे दोन कारणांसाठी :१ .प्रपंचाचे स्वरुप कळण्यासाठी २ .भगवंताच्या प्राप्तीसाठी.प्रपंचाची आसक्ती कमी
करण्यासाठी .नाम घेण्याने भगवंताच्या इच्छेने घडायाचे ते घडते असे मानणे सोपे जाते .त्यासाठी
चालता बोलता धंदा करिता । खाता जेविता सुखी होता । नाना उपभोग भोगिता । नाम विसरो नये। । ४ -३ -७ । ।
संपत्ति अथवा विपत्ति । जैसी पडेल काळगती। नामस्मरणाची स्थिती । सोडूचि नये । । ४ -३ -८ । ।
नामस्मरण केव्हा करावे ?
नित्य नेम प्रात:काळी । माध्यान्ह काळी सायंकाळी। नामस्मरण सर्वकाळ। करीत जावे । । ४ -३ -३ । ।
सुखात ,दु:खात ,चिंतेत असताना ,आनंदात असताना ,संकटात ,चांगल्या परिस्थितीत ,वैभवात,कुस्थितित सदा सर्वदा नाम घ्यावे .कोणत्याही स्थितीत नाम सोडू नये .नामाने संकटे दूर जातात ,याचा अर्थ संकटे येतात पण ती
सहन करण्याची शक्ती येते ।
नाम कोणी घ्यावे ?
चहू वर्णा नामाधिकार । नामी नाही लहानथोर । जड़ मूढ़ पैलपार । पावती नामे । । ४ -३ -२४ । ।
नाम कोणीही घ्यावे ,कोणत्याही जातीचा ,धर्माचा असला तरी त्याला नामाचा अधिकार आहे .नामाने जड़ ,मूर्ख
असला तरी तो शहाणा होतो .पैलपार होतो .म्हणून समर्थ म्हणतात ,
म्हणौन नाम अखंड स्मरावे । रूप मनी आठवावे । तीसरी भक्ती स्वभावे । निरोपिली । । ४ -३ -२५ । ।
जप माळेत १०८ मणी का असतात ?
२४ तासात २१६०० श्वास होतात .दिवसा १०८०० व रात्री १०८०० .नैसर्गिक रित्या आपल्या श्वासाबरोबर सोहं चा जप
चालू असतो .नैसर्गिक जपाच्या एक शतांश जरी जप साधला तर धन्य समजावे १०८०० /१०० =१०८ या हिशोबाने
१०८ मण्याची जपमाळ तैयार केली जाते ।
समर्थ नामस्मरणावर लिहिलेल्या अभंगात म्हणतात ,
रात्रंदिवस मन राघवी असावे । चिंतन नसावे कांचनाचे।
कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतन । जन्मासी कारण ही ची दोन्ही ।
दोन्ही नको धरू नको निंदा करू । तेणे हा संसारू तरसील ।
तरसील भवसागरी बुडता । सत्य या अनंताची नामे ।
नामरूपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संत संग धरा । ।