Wednesday, March 18, 2009

सद्शिष्य कसा असावा ?

सद् शिष्य कसा असावा ?
सद्गुरु ची लक्षणे सांगून झाल्यावर समर्थ सद् शिष्याची लक्षणे सांगतात .परमार्थात सद्गुरु व सद् शिष्य यांची सांगड
होणे महत्वाचे असते कारण -
सद्गुरुविण सद् शिष्य । ते वाया जाय निशेष । का सद् शिष्येविण विशेष । सद्गुरु शिणे। । ५ -३ -२ । । सद् शिष्याला सद्गुरु भेटला नाही तर तो पूर्ण वाया जातो .तसेच सद्गुरुला सद् शिष्य भेटला नाही तर सद्गुरुला श्रम
होतात
.ही गोष्ष्ट स्पष्ट करण्यासाठी ते भूमीचा दृष्टांत देतात .भूमी उत्तम आहे ,पण बी किडके आहे तर पीक येत नाही ,किंवा बी उत्तम आहे पण जमीन खडकाळ आहे तरी पीक येत नाही .
सद् शिष्य ही उत्तम भूमी ,तर सद्गुरु उत्तम बी सारखा .शिष्य अनाधिकारी ,अपात्र असेल तर सद्गुरुला फुकट श्रम होतात .जेव्हा सद्गुरु व सद् शिष्य एकत्र येतात तेव्हा सद्गुरूंना वाटत की हाच तो ज्याची मी वाट पाहात
होतो .रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांना पाहून असच वाटल,श्री समर्थांना कल्याण स्वामींना पाहून असेच वाटले सद्गुरु ,सद् शिष्य आहेत पण अध्यात्म निरूपण नसेल उपयोग होत नाही ,जसे पीक तयार होउन आले तरी त्याची निगा राखावी लागते .त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले तरी साधन चालू ठेवावे लागते .कारण साधन नसेल तर अविद्येचा अंमल होतो .
म्हणौन साधन अभ्यास आणि सद्गुरु । सद् शिष्य आणि सद्शास्त्र विचारू ।
सत्कर्म सद्वासना पारू । पाववी भवाचा । । समर्थ म्हणतात ,'साधन ,अभ्यास ,सद्गुरु ,सद् शिष्य ,सद्शास्त्र विचार सत्कर्म सद्वासना या सर्व गोष्टी एकत्र असतील तरच भवसागर पार करून जाता येइल .
आता समर्थ सद् शिष्याचे लक्षण सांगत आहेत ,
मुख्य सद् शिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । अनन्य भावे शरण । या नाव सद् शिष्य । । ५ -३ -१९ । ।
सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ,व सद्गुरुला अनन्य भावे शरण जाणे ही सद् शिष्याची लक्षणे आहेत .कल्याण स्वामी सारखे शिष्य सद्गुरुंच्या केवळ 'कल्याणा छाटी उडाली 'या शब्दाखातर उंच कड्यावरून छाटी पकडण्यासाठी उडी घेतो तेव्हा तो जीवाचा विचार करत नाही ,सद्गुरूंनी सांगितले ते करायचे एव्हडेच त्याला माहीत !
सद् शिष्य कसा असावा ?
शिष्य निर्मल अंत :करणाचा ,आचारशील-आचाराने शुद्ध ,शुद्ध चारित्र्याचा ,विरक्त-हवे नको पण संपलेला , अनुतापी-झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप वाटून त्या चुका पुन्हा न करणारा ,निष्ठावंत-सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ठेवणारा ,सुचिश्मंत -ज्याची मती म्हणजे बुध्दी अतिशय शुद्ध आहे असा ,नेमस्त -नित्य नेम पाळणारा,साक्षपी -प्रयत्न करणारा ,परम दक्ष-अतिशय सावध ,अलक्षी लक्षी -अतींद्रिय वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याचे मनोबल असणारा ,परोपकारी-दुस-याला मदत करणारा ,निर्मत्सरी-कोणाचाही मत्सर ,द्वेष न करणारा ,अर्थांतरी प्रवेशकर्ता -ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंतरंगात शिरणारा ,नीतिवंत -चांगल्या वाईटाचा विचार करणारा ,युक्तिमंत -हिकमती ,बुध्दीमंत -बुध्दीमान् ,सद्विद्येचा -उत्तम लक्षणांचा ,निर्लोभी ,निराभिमानी ,अनासक्त अशा गुणानी युक्त असावा .
सद् शिष्य कसा नसावा ?
अविवेकी नसावा ,गर्भश्रीमंत नसावा ,अविश्वासी नसावा .कारण -
अविश्वासे कास सोडिली । ऐसी बहुतेक भवी बुडाली । नाना जळचरे तोडिली । मध्येच सुख दु:खे । । ५ -३ -३७ । ।
या कारणे दृढ़ विश्वास । तोचि जाणावा सद् शिष्य ।मोक्षाधिकारी विशेष । आग्रगण्यु। । ५ -३ -३८ । ।

Tuesday, March 10, 2009

सद्गुरु कसा असावा ?


सद्गुरु कसा असावा ?
समर्थ गुरुलक्षण सांगताना सद्गुरु कसे ओळखावे ते सांगतात .चौदा विद्या ,चौसष्ट कला शिकवणारे गुरु सद्गुरु नाहीत असे सांगतात ,कारण ह्या सर्व कला पोटार्थी आहेत .त्या कोणत्याही कलेतून आत्मज्ञान प्राप्त होणार नाही ,त्यामुळे त्या कला शिकवणारे गुरु सद्गुरु नाहीत .आपले आई वडील सुद्धा आपले गुरु असतात ,पण सद्गुरु नसतात ,कारण ते आत्मज्ञान देत नाहीत .
मग सद्गुरु कोणाला म्हणायच ?त्यांची लक्षणे कोणती ?
बिघडले देव आणि भक्त । जीवशिवपणे द्वैत । तया देव भक्ता येकांत। करी तो सद्गुरु । । ५ -२ -१० । ।
प्रत्येक जीव स्वत :ला देह समजतो ,त्यामुळे देव आणि जीव ,देव आणि भक्त यात द्वैत निर्माण होते .ते द्वैत नाहीसे करण्याचे काम सद्गुरु करतात .देव आणि भक्त यांची गाठ घालून देतो .
प्राणी मायाजाळी पाडिले। संसार दु:खे दु:खवले । ऐसे जेणे मुक्त केले । तो सद्गुरु जाणावा । । ५ -२ -१२ ।
जीव मायाजाळी पडतो ,याचा अर्थ प्राणी स्वत :ला देह समजतो ,मी ,माझे ,माझी बायको ,माझी मुले ,माझा व्यवसाय सर्व माझ समजतो .त्यामुळे दु :खी होतो .मी कर्ता समजतो .यश मिळाल तर आनंदी होतो ,अपयश मिळाल तर दु :खी होतो . सद्गुरु आत्मज्ञान देवून देह्बुध्दी नाहिशी करतो ,आत्मबुध्दी निर्माण करतो .
सुखदु :खातून प्राण्याची सुटका करतो .
वासनानदी माहांपुरी । प्राणी बुडता ग्लांती करी । तेथे उडी घालून तारी । तो सद्गुरु जाणावा । ।५-२-१३ । वासना म्हणजे एखादी वस्तू हवीच असे वाटणे .एक वस्तू मिळाली की दूसरी वस्तू हवी वाटते.त्यामुळे वासना नदी म्हटले आहे .हव नको कधी संपत नाही म्हणून वासनानदी चा महापूर म्हटले आहे .त्यामुळे प्राणी वासनेच्या महापुरात बुडून जातो ,तेथे सद्गुरु जीवाला हात देऊन वाचवतो ।
गर्भवास अति सांकडी । इच्छा बंधनाची बेडी। ज्ञान देऊन सीघ्रसोडी । तो सद्गुरु स्वामी । । ५ -२ -१४ । ।
इच्छा अनेक असल्यामुळे माणूस बंधनात पडतो .त्यामुळे बध्द होतो .जन्म मृत्यु च्या फे-यात
अडकतो . सद्गुरु आत्मज्ञान देऊन बंधनाची बेडी तोडतो .प्राण्याची पुन्हा पुन्हा होणा-या गर्भावासातून सुटका करतो ,तो सद्गुरु असतो .
बाणे तिहींची खूण
। तोचि गुरु सुलक्षण । तेथेचि रिघावे सुलक्षण । अत्यादरे मुमुक्षे। । ५ -२ -३० । ।
शास्त्रप्राचिती ,गुरुप्राचिती आणि आत्मप्रचिति ,यांचा मनोहर संगम गुरूच्या ठिकाणी असतो .श्रुती मध्ये व संताच्या ग्रंथामध्ये वर्णिलेला स्वरूपानुभाव ,सद्गुरुचा स्वानुभव ,आणि स्वत :चा अनुभव [गुरुचा ] अनुभव एकच असतो.त्याच गुरुलाच शरण जावे असे समर्थ म्हणतात .
मुख्य सद्गुरूचे लक्षण । आधी पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचे समाधान । स्वरूपस्थिती । । ५ -२ -४५ । सद्गुरूचे मुख्य लक्षण आहे शुध्द ज्ञान .शुध्द ज्ञानामुळे त्याला मिळालेले समाधान कधीही भंग पावत नाही .आत्मज्ञानाने त्याचे संशय नाहीसे होतात .आत्मस्वरूपाशी सतत अनुसंधान राखले जाते .तो समाधानरूपच असतो .तो स्वस्वरूपापासून कधीही ढळत नाही.
म्हणोनि नवविधा भजन । जेथे प्रतिष्ठ्ले साधन । हे सद्गुरूचे लक्षण । श्रोती वोळखावे। । ५ -२ -४९ । ।
जो गुरु नवविधा भक्ती साधकांना करायला शिकवतो ,जो साधन मार्गास प्रतिष्ठा देतो तो सद्गुरु असतो.सद्गुरु शुध्द ज्ञानाने युक्त असल्याने त्याच्या जवळ साधकांना विश्रांती मिळते .ज्ञान वैराग्य ,भजन ,स्वधर्मकर्म , साधन ,कथा निरूपण ,श्रवण ,मनन ,नीति ,न्याय ,मर्यादा या सर्व गोष्टींचे पालन केले जाते तो सद्गुरु असतो .
जे जे काही उत्तम गुण । ते ते सद्गुरूचे लक्षण । तथापि सांगो ओळखण । होए जेणे। । ५ -२ -६५ । ।
सद्गुरु मध्ये सर्व प्रकाराचे उत्तम गुण असतात .आत्मज्ञाना मुळे जे सहज गुण येतात ते सद्गुरुत
असतातच ,याशिवाय अज्ञानी जीवांबद्दल अतिशय दया त्यांच्या अंगी असते .म्हणून समर्थ म्हणतात ,
नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण । हे सद्गुरूचे लक्षण । जाणिजे श्रोती । । ५ -२ -७३ । ।



Sunday, March 1, 2009

चत्वार मुक्ती

चत्वार मुक्ती
आत्मनिवेदन भक्ती सांगितल्यावर समर्थांनी या भक्तींचे फळ म्हणजे चार मुक्ती सांगितल्या आहेत .१ सलोकता
२ समीपता ३ सरूपता ४ सायुज्यता .
आत्मनिवेदन भक्तीत शेवटी समर्थ म्हणतात ,
ऐसी हे नवविधा भक्ती । केल्या पाविजे सायोज्यमुक्ती । सायोज्यमुक्तीस कल्पांती। चळण नाही । । ४ -९ -२६ । ।
नवविधा भक्तीचे आचरण केले तर सायोज्य मुक्ती लय पावत नाही .वेद व शास्त्रांनी चार मुक्तींचे वर्णन केले आहे मुक्तींचे वर्णन करण्यापूर्वी मुक्ती म्हणजे काय ते पहायला हवे .मोक्षयती दु:ख़म अनेन इति मुक्ती: । सर्व प्रकारच्या दु:खापासून बंधनापासून ,वासनांपासून ,अज्ञानापासून सुटण्याची ,मोकळे होण्याची अवस्था म्हणजे मुक्ती !
दशक ४ समास १० मध्ये समर्थांनी चारही मुक्तींच्या व्याख्या केल्या आहेत .
येथे ज्या देवाचे भजन करावे । तेथे ते देवलोकी रहावे । स्वलोकता मुक्तीचे जाणावे। लक्षण ऐसे । ।
४ -१० -२३ । ।
लोकी रहावे ते स्वलोकता । समीप असावे ते समीपता । स्वरूपचि व्हावे ते स्वरूपता।तिसरी भक्ती।।
४ -१० -२४। ।
देवस्वरुप झाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही । स्वरूपतेचे लक्षण पाही । ऐसे असे । । ४ -१० -२५ । ।
सुकृत आहे तो भोगिती । सुकृत सरताच ढकलून देती । जैसे तैसे । । ४ - १० -२६ । ।
ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाच्या लोकात रहायला मिळणे याला सलोकता मुक्ती म्हणतात .देवाच्या जवळ रहायला मिळणे याला समीपता मुक्ती म्हणतात .देवाच्या रूपा सारखे रूप मिळणे याला सरूपता मुक्ती म्हणतात.पण जेव्हा पुण्य संपते तेव्हा त्या लोकातून ,देवाच्या जवळून खाली मृत्युलोकात यावे लागते .त्यामुळे या
तीनही मुक्ती नाशिवंत आहेत .तर शेवटची मुक्ती सायोज्यता मुक्ती .आत्मनिवेदन भक्तीत मी चे समर्पण असते .तेव्हा जीव व शिवाची ऐक्यता असते .भक्ताचा विभक्तपणा संपतो .साधक भगवंताशी समरस झाला मीपणा ने तो वेगळा होऊ शकत नाही .तेव्हा संसारात समाजात असून तो नसल्या सारखा असतो ।
जीवनातल्या सुखदु :खांची मजसी का बाधा ?जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा । अशी अलिप्त पणाची अवस्था असते .तुकाराम महाराज म्हणतात -तुका म्हणे उरलो उपकारापुरता ।
दशक ११ समास १ मध्ये समर्थ म्हणतात ,
निर्गुणी जे अनन्यता । तेचि मुक्ती सायोज्यता । लक्षांश वाच्यांश आता । पुरे झाला । । ११ -१ -४२। ।
निर्गुणाशी अनन्यता होणे म्हणजे सायोज्य मुक्ती .श्रवणाने बुध्दीमध्ये स्वरूपाबद्दल निश्चय होणे व ती टिकवणे म्हणजे सायोज्यमुक्ती .