Sunday, April 25, 2010

करून अकर्ता आणि भोगुन अभोक्ता कोण ?

सकळ करून अकर्ता । सकळ भोगून अभोक्ता । सकलामध्ये अलिप्तता । येईल कैसी । । ९ -३ -२ । ।
तथापि तुम्ही म्हणतां । योगी भोगून अभोक्ता । स्वर्गनर्क ही आता । येणेची न्याये। । ९ -३ -३ । ।
जन्म मृत्य भोगिलेच भोगी । परी तो भोगून अभोक्ता योगी । यातना ही तयालागी। येणेची पाडे । ९-३-४ । ।।
कुटून नाही कुटिला । रडोनि नाही रडला । कुंथोंन नाही कुंथिला । योगेश्वर । । ९-३ -५ । ।
श्रोता आक्षेप घेतो की माणूस ब्रह्मज्ञानी असला तरी त्याला यातना ,दु:ख ,संकटे भोगावी लागतात .याचा त्याच्या मनावर काहीच परिणाम होत नाही का ?सगळी कर्मे करून अकर्तेपणा ,सगळे भोग भोगून अभोक्तेपणा ,व सर्वांमध्ये राहून अलिप्तपणा कसा येईल ?समर्थ उत्तर देतात :
ज्याचा अनुभव जैसा । तो तो बोलतो तैसा । संपदेविण जो धिवसा। तो निरर्थक । । ९ -३ -९ । ।
ज्याला जसा अनुभव येतो त्याला प्रमाण धरून तो जीवनाचा अर्थ समजतो .उदा: ज्याच्या जवळ संपत्ती नसते तो मोठे साहस करू शकत नाही .त्याला मोठ्या साहसाची कल्पना करता येत नाही .तसे ज्याच्या जवळ आत्मज्ञान रूपी संपत्ती नसते त्याच्या जवळ अज्ञान रूपी दारिद्र्य असते .तो जन्म मृत्यु च्या फे-यात अडकतो . ज्याप्रमाणे भूतबाधा झालेला माणूस व भूतबाधा नाहीशी झालेला यांची योग्यता वेगवेगळी असते त्याप्रमाणे व जीवन्मुक्त ज्ञानी देहाने दिसले तरी त्यांची योग्यता नसते.आत्मज्ञानी माणसाचे थोरपण स्वस्वरूपाच्या अनुसंधानात असते .
जो जो ज्ञाने गुप्त जाला । जो विवेके विराला । जो अनन्य पणे उरला । नाहींच काही । । ९ -३ -१९ । ।
आत्मज्ञानाने जो गुप्त होतो म्हणजे ज्याचा मीपणा अंतर्धान पावतो ,निदिध्यासाने स्वस्वरूपात विलीन
होतो ,स्वस्वरूपाशी एकरूप होतो .तो वेगळेपणाने उरत नाही .
देही पाहता दिसेना । तत्वे शोधिता भासेना । ब्रह्म आहे निवडेना। काही केल्या । । ९ -३ -१९ । ।
दिसतो जरी देहधारी । परी कांहीच नाही अंतरी । तयास पाहता वरीवरी । कळेल कैसा । । ९ -३ -२० । ।
जो त्याला शोधायला जातो तो स्वत : तेच रूप बनतो .मग तदाकार झाल्यावर बोलणे ,चालणे,शोध घेणे सगळे थांबते .देहात पहायला गेले तर तो देहात आढळत नाही .ब्रह्मामध्ये तो ब्रह्मस्वरूप होउन असतो .जो त्याला शोधायला जातो तो स्वत : तेच रूप बनतो .मग तदाकार झाल्यावर बोलणे,चालणे,शोध घेणे सगळे खूंटते.देहात पहायला जावे तर तो देहात आढळत नाही ,पंचभूतातही आढळत नाही .ब्रह्मामध्ये ब्रह्म स्वरुप होउन तो
असतो .त्याला स्वरूपाहून वेगळे काढता येत नाही .बाहेरून तो सामान्य माणसासारखा देहधारी असतो .पण अंतरी 'मी देह आहे 'अशी जाणीव नसते .त्याला वरवर पाहून त्याची अवस्था कळत नाही .
तो परमात्मा केवळ। तयास नाही माया मळ। अखंड हेतूचा विटाळ। जालाच नाही । । ९-३ -२२ । ।
तो शुध्द व केवळ परमात्मस्वरुप असतो .त्याच्या जवळ मायेचा मळ नसतो .कोणत्याही संकल्पांचा स्पर्श त्याला होत नाही .त्याची अंतरिक स्थिती वेगळी असते .त्याला कोणताही इच्छा ,वासना ,संकल्प नसतात .तो स्वस्वरूपाचा अनुभव परब्रह्माशी तदाकार होउन घेतो .त्यामुळे तो स्वत :चा राहत नाही .'देव पहाया गेलो आणि देवचि होऊनी ठेलो !'अशा अनुभवाचा धनी होतो .त्यामुळे अविद्या व जीवपणा नाहीसा होतो .त्याला जन्म मरण उरत नाही .सगळीकड़े तो गच्चपणे भरून असतो .
तसा साधू आत्मज्ञानी ,ज्ञानाने पूर्ण समाधानी ,निदिध्यासाने अनन्य होउन आत्म स्वरूपाकार बनतो .

ब्रह्माचे वर्णन नाहीपणाने,का केले ?

ब्रह्माचे वर्णन नाहीपणाने करताना परब्रह्माची बेचाळीस लक्षणे सांगितली आहेत .परब्रह्म अतींद्रिय आहे .तेथे
बुध्दी ,वाणी इंद्रियांना प्रवेश नाही .आणि ब्रह्माचे साम्राज्य अनन्यतेचे किंवा अद्वैताचे !बुध्दीचे साम्राज्य असते वेगळे पणाचे किंवा द्वैताचे असते म्हणून ज्ञानी संत अज्ञानाला ब्रह्मस्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतात .तेव्हा ब्रह्म असे नाही तसे नाही असे वर्णन करावे लागते .तसेच' नाही ' म्हणून वर्णन करताना समर्थ सांगतात :
ब्रह्माला आकार नाही म्हणजे निराकार आहे ,आधार नाही म्हणजे निराधार आहे ,त्याचे जवळ कल्पना नाही म्हणजे निर्विकल्प आहे .जळमय नाही म्हणजे निरामय आहे .त्याचेकडे भास् नाही म्हणजे निराभास
आहे ,अवयव नाहीत म्हणजे निरावयव आहे ,प्रपंच नाही म्हणजे नि :प्रपंच आहे ,कलंक नाही म्हणजे
नि :कलंक ,उपाधी नाही म्हणजे निरोपाधी ,उपमा नाही म्हणजे निरोपम्य ,अवलंबन नाही म्हणजे
निरालंब ,अपेक्षा नाही म्हणजे निरापेक्ष ,जनची नाही म्हणजे निरंजन ,अंतर नाही म्हणजे निरंतर ,गुण नाही म्हणजे निर्गुण ,संग नाही म्हणजे नि:संग ,मळ नाही म्हणजे निर्मळ,चळन नाही म्हणजे निश्चळ,शब्द नाहीत म्हणजे नि :शब्द ,दोष नाहीत म्हणजे निर्दोष ,वृत्ती नाही म्हणजे निवृत्त ,काम नाही म्हणजे नि :काम ,लेप नाही म्हणजे निर्लेप ,कर्म नाही म्हणजे नि :कर्म ,नाम नाही म्हणजे अनाम्य,जन्म नाही म्हणजे अजन्मा ,प्रत्यक्ष नाही म्हणजे अप्रत्यक्ष ,गणीत नाही म्हणजे मोजमाप करता येत नाही म्हणजे अगणीत ,कर्तव्यता नाही म्हणजे अकर्तव्य ,क्षय नाही म्हणजे अक्षय ,रूप नाही म्हणजे अरूप ,लक्षत नाही म्हणजे मनाला आकलन होत नाही ,अंत नाही म्हणजे अनंत ,पार नाही म्हणजे अपार ,ढळ नाही म्हणजे अढळ म्हणजे आपल्या स्थानापासून भ्रष्ट होत नाही ,द्वैत नाही म्हणजे अद्वैत ,दृश्य नाही म्हणजे अदृश्य ,च्युत नाही म्हणजे स्थानावरून घसरत नाही म्हणजे अच्युत ,तोड़ता येत नाही म्हणजे अछेद ,जाळता येत नाही म्हणजे अदाह्य ,पाण्याने भिजत नाही म्हणजे अक्लेद !
म्हणजेच परब्रह्म दृश्य विश्वाच्या पलिकडे आहे .त्याच्या सारखे दुसरे कोणी नाही .दुसरे काही त्याच्या
सारखे नाही .दृश्य खरे असे मानण्या-या अज्ञानी माणसांना दृश्य वस्तूंची ,संबंधांची ,कल्पनांची भाषा कळते.त्या
वस्तूंचा ,संबंधांचा ,कल्पनां चा परब्रह्माशी संबंध जोडून परब्रह्म असे नाही ,तसे नाही असे सांगावे लागते .

Friday, April 23, 2010

प्रत्येकाचा अनुभव वेगळा!

जनाचे अनुभव पुसता । कळहो उठिला अवचिता । हा कथा कल्लोळ श्रोता । कौतुके ऐकावा । । ८ -१० -१ । ।
जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो ,तो काय आणि कोणत्या स्थितीत लोक राहतात असा प्रश्न श्रोते समर्थांना विचारतात .समर्थ सांगतात :
एक म्हणतो आपण संसारच करावा .संसार पार करत करत त्यातून [भवसागरातून ] पार पाडावे .दूसरा म्हणतो -संसार कसा सहजपणे व सुखाने व्हायला हवा .पण त्यामुळे सद्गति प्राप्त होणार नाही .सद्गति मिळावी म्हणून काही दान पुण्य करावे .
एक म्हणतो संसारच खोटा आहे मग तो कशाला करावा .सरळ वैराग्य धारण करून करून देशांतराला जावे .वैराग्याने स्वर्ग प्राप्ती तरी होइल .
एक म्हणतो आपले घर सोडून कोठे जाणार ?उगाचच पायपीट होइल .आपला गृहस्थाश्रम सांभाळून असावे .
एक म्हणतो धर्म वगैरे काही नाही .सगळीकड़े अधर्म बोकाळला आहे .प्रत्येकाला चांगली वाईट कामे करावीच लागतात .
एक म्हणतो वासना शुध्द ठेवायला हवी,म्हणजे माणूस विनासायास संसार तरतो .
एक म्हणतो संसार तरायला हवा असेल तर भगवंतावर निष्ठा ठेवायला हवी .
एक म्हणतो आई बाबांना मनापासून देव मानावे ,त्यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांची पूजा करावी .
एक म्हणतो शास्त्रात सांगितल्या प्रमाणे वागले की परलोक प्राप्त होतो .
एक जण म्हणतो की शास्त्रांचा अभ्यास एका जन्मात होणारा नाही .त्यापेक्षा साधूंना शरण जावे ।
एक म्हणतो या सर्वांपेक्षा अंत:करणात भूतदया ठेवावी ।
एक म्हणतो आपल्या आचार धर्माने वागावे ..अंतकाळी भगवंताचे नाम घ्यावे .नाहीतर अंतकाळी माणसाला भ्रम होतो .
एक म्हणतो तीर्थाटन करावे .एक म्हणतो तीर्थाटनात पाणी आणि पाषाण च बघायचे .एक म्हणतो तीर्थाच्या दर्शनाने मोठ्या पापांची होळी होते .
एक म्हणतो मन आवरणे सगळ्या साधनांचा हेतू आहे .मग मनच आवरावे .
एक म्हणतो योगसाधन करावे .ते उत्तम आहे .त्याने देह अमर करावा ।
एक म्हणतो भक्तिमार्ग धरावा .एक म्हणतो ज्ञानमार्ग सर्वात उत्तम .साधना करावी .एक म्हणतो मुक्तपणे
वागावे .एक म्हणतो स्वैर वागताना पापाचा कंटाळा करावा .एक म्हणतो कोणाची निंदा करू नये.दुष्टांची संगत सोडावी .ज्याचे अन्न खातो त्याच्या चाकरीत त्याच्या समोर देह ठेवावा .त्याने मोक्षपद मिळते.
एक म्हणतो आधी खायला व्यवस्थित मिळवावं मग बाकीच्या गोष्टी !
एक म्हणतो खूप तप:श्चर्या करून तप साठवावे,त्याने सर्व सिध्दी वश होतात .
एक म्हणतो मंत्रतंत्राचा अभ्यास करून वेताळ प्रसन्न करून घ्यावा .एक म्हणतो अघोर मंत्र साध्य
करून घ्यावा .एक म्हणतो मृत्यृंजयाचा जप करावा .
अशी अनेक मते समर्थानी दशक ८ समास १० मध्ये मांडली